सरकारी शाळांत मुलांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या दर्जावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. काही ठिकाणी या मध्यान्ह भोजनाचा दर्जा अत्यंत वाईट असल्याचा किंवा यामुळे मुलांना त्रास होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे केरळचे IAS अधिकारी एस सुहास यांनी या बाबीत जातीनं लक्ष घालायचं ठरवलं आहे. नुकतीच त्यांनी एका शाळेला अकस्मिक भेट दिली. या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारं मध्यान्ह भोजन त्यांनी स्वत: आधी चाखून पाहिलं नंतर लहान मुलांसोबत बसून ते जेवले देखील. जेवणाच्या दर्जाबाबत त्यांनी स्वत: लक्ष घालून रिपोर्ट तयार केला आहे.

अल्लापुझाचे जिल्हाधिकारी असलेल्या सुहास यांनी श्रीदेवी विलासम् सरकारी शाळेला दुपारच्या सुमारास अचानक भेट दिली. सरकारी शाळेतील मुलांना देण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाचा दर्जा त्यांनी तपासला. जेवण पौष्टिक आहे का? ते मुलांना वाढताना स्वच्छतेची काळजी घेतली जाते का? जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या सामग्रीचा दर्जा या सगळ्या गोष्टी या तरुण अधिकाऱ्यांनं स्वत: तापासून पाहिल्या.
त्यांनी स्वत: या भोजनाचं मूल्यांकन केलं. इतकंच नाही तर शाळेचं ग्रंथालय, वर्ग यांना देखील भेट देत मुलांना योग्य वातावरणात शिक्षण दिलं जातंय की नाही याचीही खातरजमा करुन घेतली. त्यामुळे, सोशल मीडियावर त्यांचं विशेष कौतुक होत आहे.