रातोरात करोडपती होणं म्हणजे काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव केरळमधील कोल्लम येथे राहणाऱ्या एका लॉटरी विक्रेत्याला येत आहे. या लॉटरी विक्रेत्याकडून न विकल्या गेलेल्या तिकीटाला चक्क १२ कोटींची लॉटरी लागली आहे. केरळ सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या केरळ लॉटरीचा नाताळ आणि नवीन वर्षानिमित्तची जॅकपॉट लॉटरीचे १२ कोटी या विक्रेत्याने जिंकलेत. तामिळनाडूच्या सीमेजवळ असणाऱ्या टेनकसाई प्रांतात राहणाऱ्या ४६ वर्षीय सैफुद्दीन ए. असं या लॉटरी विक्रेत्याचं नाव आहे. या लॉटरी विक्रेत्याने विक्रीसाठी घेतलेल्या तिकीटांपैकी एका तिकीटाला थेट १२ कोटींची लॉटरी लागल्याचे जेव्हा समजलं तेव्हा सुरुवातील यावर त्यांचा विश्वासच बसला नाही.

कोल्लम जिल्ह्यातील कार्यानाकावूजवळच्या अरविंधर्मपूरममध्ये सरकारी मालकीच्या जमीनीवर असणाऱ्या एका छोट्याश्या घरात सैफुद्दीन राहतात. तरुण वयामध्ये आखाती देशांमध्ये नोकरी केल्यानंतर आता सैफुद्दीन मूळ गावी परतले होते. मात्र भारतात परत आल्यानंतर आपल्या कुटुंबातील सहा जणांची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. त्यातच करोना महामारीमुळे या सहा जणांसाठी दोन वेळेच्या अन्नाची सोय करण्यासाठीही सैफुद्दीन यांना बरेच कष्ट घ्यावे लागले.

या पैशांमधून काय करणार असं विचारलं असता सैफुद्दीन यांनी मला माझं एक घर बांधायचं आहे, असं सांगितलं. तसेच माझ्यावर असलेलं सर्व कर्ज फेडून टाकायचं आहे आणि एखादा छोटा उद्योग या पैशांमधून सुरु करणार आहे, असंही सैफुद्दीन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. २०१३ साली सैफुद्दीन रियाधमधून भारतात परतले. नऊ वर्ष नोकरी केल्यानंतर सैफुद्दीन यांनी नोकरीसाठी यापुढे आखाती देशांमध्ये जायचं नाही असं ठरवलं आणि ते तेव्हापासून छोटीमोठी काम करु लागले. सध्या ते लॉटरीची तिकीटं विकण्याचं काम करायचे.

सैफुद्दीन यांच्या कुटुंबामध्ये त्यांची आई, दोन भाऊ, पत्नी आणि दहावीला असणारा मुलगा परवेज यांचा समावेश आहे. यापूर्वीही आपल्याला लॉटरीमध्ये लहान मोठी बक्षिसं मिळाली असल्याचंही सैफुद्दीन सांगतात. मंगळवारी सैफुद्दीन हे तिरुअनंतपुरमच्या लॉटरी डारेक्टरसमोर हजर झाले होते. ज्या तिकिटाला १२ कोटींची लॉटरी लागली हे तिकीट घेऊन सैफुद्दीन आले होते. या लॉटरीवर सैफुद्दीन यांना ३० टक्के रक्कम कर आणि १० टक्के एजंट कमिशन म्हणून वजा करुन सात कोटी ५० लाख रुपये देण्यात येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

इडुक्की जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात राहणारा २४ वर्षीय अनंथू विजयन हा सप्टेंबर महिन्यामध्ये केरळ सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या ओणम विशेष थिरुवोनम बम्पर २०२० लॉटरीचा विजेता ठरला होता. थोवालामधील कट्टपाना येथे राहणारा अनंथूला १२ कोटींची लॉटरी लागली. अनंथू हा एर्नाकुलम येथील कडवनाथ मंदिरामध्ये क्लार्क म्हणून काम करतो. या लॉटरीमुळे तो रातोरात करोडपती झाला.