21 November 2019

News Flash

आईच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाचं भावनिक पत्र, नेटकरी भावूक

गोकुळ श्रीधर यांनी आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नानंतर लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

‘आई, सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा’ केरळमधील कोल्लम येथील गोकुळ श्रीधर याने आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नानंतर लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही पोस्ट वाचून अनेकजण भावूक झाले आहेत. मल्याळम भाषेत असणाऱ्या या ह्रदयस्पर्शी पोस्टमध्ये गोकुळ याने आपल्या आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गोकुळ याच्या फेसबूक पोस्टमधून त्यांच्या आईने आयुष्यात खूप हालअपेष्टा सहन केल्याचं कळत आहे.

गोकुळ याच्या आईला पहिल्या पतीकडून घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागलं होतं. फक्त आपल्यासाठी आई हे सर्व सहन करत असल्याची खंत नेहमी गोकुळ याला वाटत होती. आपल्या मनावर एक ओझं घेऊन तो नेहमी जगत होता. पण आता जेव्हा त्याच्या आईने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे तेव्हा गोकुळ यांनी आपण आनंदी असून, यापेक्षा दुसरी सुखावणारी कोणतीच गोष्ट नाही असं म्हटलं आहे.

‘ज्या महिलेने माझ्यासाठी तिचं सारं सुख बाजूला ठेवलं. तिने पहिल्या पतीकडून अनेक यातना सहन केल्या आहेत. जेव्हा तिला मारहाण व्हायची, डोक्यातून रक्त वाहायचं तेव्हा अनेकदा तू हे का सहन करत आहेस हे मी तिला विचारायचो. यावेळी अनेकदा मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी सहन करत असल्याचं ती सांगायची हे मला स्पष्ट आठवतं. तो दिवस जेव्ही मी तिच्यासोबत घर सोडलं तेव्हा मी या सर्व क्षणांचा विचार केला. जिने माझ्यासाठी सर्व तरुणपण घालवलं, त्या माझ्या आईची अनेक स्वप्नं आहेत. अजून खूप मोठी उंची तिला गाठायची आहे. मला अजून काही बोलायचं नाही. ही अशी एक गोष्ट आहे जी लपवता कामा नये असं मला सारखं वाटत होतं. आई, सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा’, असं गोकुळ याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

फेसबुकवर अशा पद्धतीने आपल्याच आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भावना शेअर करताना गोकुळ याला थोडी भीतीदेखील वाटत होती. समाजातील काही ठराविक लोक हे सकारात्मकपणे घेतील की नाही याबाबत त्यांना शंका होती. पण नंतर त्यांना याच लपवण्यासारखं काही नसून, उलट ज्यांची विचासररणी छोटी आहे त्यांनी हे वाचलंच पाहिजे असा विचार करत पोस्ट लिहिली असं त्याने सांगितलं आहे

‘हे माझ्या आईचं लग्न होतं. याबद्दल लिहावं की नाही याबद्दल मी खूप विचार केला. कारण आजही अनेक लोकांना दुसरं लग्न केलेलं पटत नाही. अनेकजण संशयी, दया आणि द्वेष या नजरेतून पाहतात. पण जरी तुम्ही पाहिलंत तरी फरक पडणार नाही’, असं गोकुळ याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

गोकुळ याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आईचा दुसऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. फेसबुकवर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून अनेकजण भावूक झाले आहेत. अनेकांनी नवदांपत्याचे कौतुक केलं आहे.

First Published on June 12, 2019 2:32 pm

Web Title: kerala man facebook post mother second marriage internet viral sgy 87
Just Now!
X