चहा हे भारतातील अतिशय आवडतं पेय. अमृत मानला जाणारा हा चहा दिवसाच्या कोणत्याही वेळेला प्रिय असणारे अनेक लोक आहेत. लोकांची हीच आवड लक्षात घेऊन सध्या अमृततुल्याबरोबरच चहाचे वेगवेगळे प्रकार मिळणारी हॉटेल्स सुरु झालेली पाहायला मिळतात. पण अमृततुल्यांची जागा अद्याप कोणीही घेऊ शकले नाही. केरळमधील एका चहावाल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर भलताच चर्चेचा विषय ठरला आहे. याचे कारण म्हणजे त्याची चहा सर्व्ह करण्याची पद्धत. आता चहा सर्व्ह करणे यात काय अवघड आहे. पण या माणसाची ही पद्धत पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

हा चहाविक्रेता चहाचे सर्व साहित्य २ लेअरमध्ये असलेला ग्लास हातात घेतो आणि अशापद्धतीने गोल फिरवतो की हे सगळे व्यवस्थित पद्धतीने एकत्र होते. काही कळायच्या आत त्याचा हात इतक्या वेगाने फिरतो की आपण त्याच्याकडे पाहतच राहतो. मग हा हाताने ग्लास फिरवून एकत्र केलेला चहा तो ऐटीत आपल्या ग्राहकांना देतो. चहाविक्रेत्याची ही अनोखी पद्धत पाहून आपल्याला अभिनेता रजनीकांतची आठवण आल्याशिवाय राहत नाही. रजनीकांतची गॉगल फिरवण्याची स्टाईल अशीच असल्याने त्याची तुलना रजनीकांतशी होत आहे. अनेकांनी या चहावाल्याचा व्हिडियो ट्विट केला असून तो अनेकांनी पाहिला आहे. काहींनी त्यावर कमेंट केली असून बऱ्याच जणांनी तो रिट्विटही केला आहे.