रिपोर्टरचा जॉब करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे असं जर तुम्हाला वाटतं असेल तर हे अजिबातच सोप्पं नाही. पत्रकारिता करताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं, एखादी घटना तुमच्यापर्यंत पोहोचवायची म्हटलं तर अनेकदा पत्रकार आपला जीव देखील धोक्यात घालतात. अनेक खाचखळगे संकटांनी भरलेलं हे क्षेत्र आहे. सगळी संकटं झेलत अचुक बातमी वाचक, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असते, आणि ही बातमी देताना अनेकदा अशी संकटं समोर येतात की ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केरळमधल्या एका रिपोर्टरचा हा व्हिडिओ आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी भरती आली होती. यावेळी लाटांच्या तडाख्यात किनाऱ्यालगत असणाऱ्या झोपड्या वाहून गेल्या होत्या. या परिस्थितीचं वार्तांकन करण्यासाठी रिपोर्टर गेला होता. वार्तांकन लाईव्ह सुरू असताना अचानक मागून मोठी लाट आली अन् त्याच्यावर आदळली. लाटेच्या तडाख्यात काही सेकंद काय झालं हे त्याला कळलं नाही, तो पूर्ण भिजलाच पण त्याची छत्रीही मोडली. पण लगेच यातून त्याने स्वत:ला सावरलं आणि पुन्हा वार्तांकनाला सुरूवात केली.