क्रिकेटच्या मैदानामध्ये षटकार मारणे आणि षटकार मारल्यानंतर चेंडू गायब होणे किंवा एखाद्याने सुंदर झेल पकडणे काही नवं नाहीय. टी-२० च्या सध्याच्या काळात तर षटकारांचा पाऊस पडतो आणि सामना पाहण्यासाठी आलेले चाहतेही कधीतरी जखमी झाल्याच्या घटना मैदानात घडतात. मात्र सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये एक मजेदार प्रकार घडला. असा प्रकार यापूर्वी कदाचित क्रिकेटमध्ये कधीच घडला नसावा असंही हा व्हिडीओ पाहिल्यावर काही चाहते म्हणत आहेत.

झालं असं की होबार्ट हरीकेन्ससाठी खेळणारा डावखुरा फलंदाज डेविड मलान याने लेग लाईडला उंच षटकार लगावला. हाच षटकार सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. मलानने मारलेला हा षटकार सीमेरेषेपलीकडे सामना पाहत बियरचा आनंद घेत असणाऱ्या चाहत्याच्या बियर ग्लासमध्ये पडला. मात्र बियर फेकून देण्याऐवजी या चाहत्याने चेंडू बियरच्या ग्लासमध्ये असतानाच ग्लास तोंडाला लावत मैदानातील सर्वांनाच हसवलं.

मलानने शनिवारी झालेल्या मेलबर्न स्टार्सविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लान्स मॉरिसला एक शानदार षटकार खेचला. हा चेंडू सीमेपलीकडे असणाऱ्या एका चाहत्याच्या बियर ग्लासमध्ये जाऊन पडला. या चाहत्याकडून सीमेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या मेलबर्न स्टार्सच्या रायनबर्डने चेंडू परत मागितला. मात्र त्या चाहत्याने चेंडू परत करण्यास नकार देत चेंडू ग्लासमध्ये असतानाच बियर पिण्यास सुरुवात केली. हे पाहून रायनबर्डबरोबरच मैदानात उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच हसू आलं. हा सर्व प्रकार मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर पाहून सारेचजण हसू लागले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडीओ शेअर केलाय.

मलानने मेलबर्न स्टार्सविरुद्धच्या सामन्यात ५६ चेंडूंमध्ये ७५ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीमध्ये मलानने सात चौकार आणि तीन षटकार लगावले. मलानच्या खेळीच्या जोरावर होबार्टने २० षटकांमध्ये १६४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्सला २० षटकांमध्ये केवळ १४३ धावांपर्यंत मजल मारता आली आणि त्यांनी सामना २१ धावांनी गमावाला. जलगगती गोलंदाज स्कॉट बोलॅण्डला सामानावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने चार षटकांमध्ये २२ धावांच्या मोबदल्यात दोन गडी बाद केले. मेलबर्न स्टार्सचा कर्णार ग्लेन मॅक्सवेलने ३७ चेंडूंमध्ये ७० धावांची खेळी केली तरी त्याच्या संघाला पराभव पत्कारावा लागला.