मांसाहारी त्यातही चिकनप्रेमी मंडळींसाठी केएफसी हा ब्रँड म्हणजे खाना खजाना. जगातील दुसरी मोठी फूडचेन म्हणून केएफसी ओळखली जाते. फ्राईड चिकन हे केएफसीचं वैशिष्टये पण आता फ्राईड चिकन किंवा अन्य कोणत्याही पदार्थांसाठी चिकन उपलब्ध नसल्यानं युकेमधली केएफसीची ९०० पैकी साडेपाचशेहून अधिक आऊटलेट्स बंद पडली आहेत. जोपर्यंत चिकनचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ही आउटलेट्स बंदच राहणार आहेत. तर उर्वरित जी आउटलेट्स आहेत ती दिवसभर सुरु न ठेवता फक्त काही तासांपुरताच सुरू ठेवण्यात येण्याचा निर्णय केएफसीनं घेतला आहे. तसेच केएफसीनं मेन्यूतही कपात केली आहे. केएफसीनं ट्विट करत याची माहिती दिली आहे. केएफसीचा हा २०१८मधला नियोजनातला सर्वात मोठा घोळ मानण्यात येत आहे.

ब्रॅण्डनामा : केएफसी

केएफसीनं काहीमहिन्यांपूर्वी डीएचएलची डिलिव्हरी पार्टनर म्हणून निवड केली. पण युकेमधल्या सर्वच आउटलेट्समध्ये चिकनचा पुरवठा करण्यापासून डिएचएलला अपयश आलं असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. यामुळे केएफसीच्या युकेमधील शेकडो आउटलेट्समध्ये चिकन वेळेवर पोहोचू शकलं नाही.  म्हणूनच कंपनीनं ट्विट करत ५६० हून अधिक आउटलेट्स काही काळासाठी बंद करत असल्याची औपचारिक माहिती दिली. केएफसी म्हणजेच केंटुकी फ्राईड चिकन या ब्रँडच्या फ्राईड चिकनला जगभरात मागणी आहे, पण आउटलेट्स काही काळासाठी बंद ठेवल्यानं  फ्राइड चिकनप्रेमीही काहीसे नाराज झाले आहेत.