आपल्या होणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं नाव काय ठेवावं याचा विचार पालक खूप आधीपासूनच करतात. बाळाच्या जन्मापूर्वीच पालाकांनी त्याच्यासाठी नाव शोधून ठेवलेलं असतं. मात्र एखाद्या पालकांना त्याच्या होणाऱ्या बाळाचं नाव हे कंपनीच्या मालकाच्या नावावरून ठेवायला सांगितलं तर..?

काही दिवसांपूर्वी ‘केएफसी’या जगातील सर्वात मोठ्या फूडचेन पैकी एक असलेल्या ब्रँडनं एका स्पर्धेच आयोजन केलं होतं. ही स्पर्धा अमेरिकेपुरता मर्यादीत होती. विजेत्यांसाठी जवळपास आठ लाखांहून अधिकचं पारितोषिक ठेवण्यात आलं होतं. मात्र स्पर्धेसाठी दोन अटी या ब्रँडनं ठेवल्या होता. पहिली अट म्हणजे होणाऱ्या बाळाचं नाव हे पालकानं ‘हारलँड’ असं ठेवलं पाहिजे आणि दुसरी अट हे बाळ ९ सप्टेंबर रोजी जन्मलं पाहिजे.

‘हारलँड’ हे केएफसीचे जनक आहेत. हारलँड सँडर्सनं केंटुकी फ्राईड चिकनची म्हणजेच केएफसीची स्थापना केली. ९ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ पालकांनी होणाऱ्या बाळाचं नाव हारलँड ठेवावं या कल्पनेतून ब्रँडनं स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेची विजेती ‘हारलँड रोझ’ नावची छोटी चिमुकली ठरली आहे. तिचादेखील जन्म ९ सप्टेंबरला झाला. तिचे पालक अॅना आणि डेकर या दोघांनीही तिचं नाव ‘हारलँड रोझ’ ठेवलं. स्पर्धेच्या दोन्ही अटी पूर्ण झाल्या असल्यानं ती केएफसी स्पर्धेची विजेती ठरली आहे. तिला ब्रँडनं जवळपास आठ लाखांहून अधिकची रक्कम आणि केएफसी चिकनच्या पाककृतीचे गुपित असलेले काही हर्ब तिला देऊ केले आहेत.