‘किट कॅट’ या कंपनीने एका तरुणाला जवळपास ६,५०० किट कॅट भेट म्हणून पाठवून दिल्या आहेत. झाले असे की मॅनहॅटनमधल्या एका कॉलेजच्या बाहेर हंटर जॉबीनीस नावाच्या तरूणाने आपली गाडी पंधरा मिनिटांसाठी पार्क केली होती. परत आल्यानंतर त्याच्या गाडीची काच चोराने फोडली होती. त्याच्या गाडीतून कोणत्याही मौल्यवान वस्तू गायब न होता फक्त किट-कॅट गायब झाल्या होत्या. याप्रकारामुळे हंटर काहीसा गोंधळला होता. या चोराने त्याच्यासाठी एक पत्रही  गाडीत ठेवले होते. ‘मला किट-कॅट खूपच आवडते. तुझ्या गाडीत ठेवलेले चॉकलेट पाहून ते खाण्याचा मोह अनावर झाला. पण गाडी लॉक होती. शेवटी नाईलाजाने मी गाडीच्या काचा फोडल्या’ असे पत्र त्याने लिहले. हंटरने हे पत्र सोशल मीडियावर टाकल्यानंतर ते चांगलेच व्हायरल होते. किट-कॅट चोरणा-या या अजब चोराची चर्चा सोशल मीडियावर रंगली. त्यानंतर ही गोष्ट कंपनीच्याही कानी गेली त्यामुळे हंटरला खुश करण्यासाठी कंपनीने चक्क ६,५०० किटकॅट त्याला पाठल्या. या किटकॅटने हंटरची गाडी पूर्णपणे भरून गेली. गाडीभर चॉकलेट्स घेऊन बसलेल्या हंटरचेही फोटोही व्हायरल झालेत. एका चोरामुळे हंटरवर किटकॅटचा पाऊस पडला अशा प्रतिक्रिया हंटरला सोशल मीडियावर येत आहे.