सध्या भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी चर्चेचं राज’कारण’ नाही तर त्याचं कारण काही दुसरंच आहे. सोशल मीडियावर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्विटर प्रोफाईलचा एक स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. तसंच यामध्ये त्यांनी आपल्या प्रोफाईलवरू भाजपा असं लिहिलेल काढल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसंच काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपातही नाराज आहेत का? अशा चर्चांना यामुळे उधाण आहे. परंतु त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवरून भाजपा त्यांनी कधी लिहिलंच नव्हतं असा दावाही अनेकांकडून करण्यात आला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटचा जो फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांनी जनतेचा सेवक आणि क्रिकेट प्रेमी असं लिहिलं आहे. यातून त्यांनी भाजपा हा शब्द हटवल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. परंतु त्यांनी काँग्रेसमध्ये असतानाच आपल्या प्रोफाईलवर जनतेचा सेवक आणि क्रिकेट प्रेमी लिहिलं होतं असा दावा मध्यप्रदेशातील मंत्री तुलसी सिलावत यांनी केला आहे. काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या अकाऊंटवरून काँग्रेसची ओळखही हटवली होती. त्यानंतर त्यांनी कधीही आपल्या प्रोफाईच्या बायोवर कोणताही बदल केला नसल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकांसाठी भाजपानं नियुक्त केलेल्या सर्व प्रभारींनादेखील शुभेच्छाही दिल्या आहेत.

मध्यप्रदेशातील मंत्री तुलसी सिलावत यांनीदेखील यावर ट्विट करत माहिती दिली आहे. काँग्रेसच्या जनतेविरोधातील धोरणांमुळे कंटाळून ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या प्रोफाईवरून काँग्रेसची ओळख काढून टाकली होती. त्यानंतर त्यांनी जनतेचा सेवक आणि क्रिकेट प्रेमी असंच लिहिलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या एका निर्णयानं काँग्रेसची प्रोफाईल तर बिघडवली. पण आता एवढं भीतीचं वातावरण पसरलं आहे की काँग्रेसचे लोकं आता स्वप्नातही त्यांच्याबाबत अफवा पसरवू लागले आहेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी २५ नोव्हेंबर २०१९ रोजी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल केला होता. त्यांनी काँग्रेस महासचिव, खासदार (२००२-२०१९) आणि माजी केंद्रीय मंत्री याऐवजी जनतेचा सेवक आणि क्रिकेट प्रेमी असं लिहिलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता.