कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची तीव्रता वाढीली असताना बचाव कार्यानेही वेग घेतला आहे. पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. हे काम नौदल, लष्कर आणि एनडीआरएफचे जवान करत आहेत. मदतकार्य करणाऱ्या जवानांवर सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षावर होत आहे. एनडीआरएफच्या जवानाने केलेल्या मदतकार्याला दाद देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या ट्विटरवरून एक पोस्ट केली आहे. मात्र, ही पोस्ट करताना चुकीचा व्हिडीओ पोस्ट केल्याचे समोर आले आहे.

पूरातून एका लहानशा माकडाला वाचवल्यानंतरचा एनडीआरएफ जवानाचा एक व्हिडीओ महाराष्ट्र माहिती केंद्राच्या ट्विटर खात्यावर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कोल्हापूरमधील असल्याचा दावा व्हिडीओ पोस्ट करताना करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ २८ जुलै रोजीचा असून बदलापूरमधील आहे. चूक लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे.

२८ जुलै रोजी मुंबईसह उपनगरात पावसाने हाहाकार घातला होता. त्यावेळी बदलापूरमध्ये एनडीआरएफच्या जवानांनी मदतकार्य केलं होतं. त्यावेळी चामटोली गावातल्या पाणवठा प्राणी अनाथालयातून एनडीआरएफच्या जवानाने तीन वर्षांच्या राणी माकडाला वाचवले होते. पोटातल्या ट्युमरवर उपचारांसाठी माकड अनाथालयात दाखल करण्यात आले होते. २७-२८ जुलै रोजी बदलापूर वांगणी भागात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती आणि याचा फटका तिथल्या प्राण्यांनाही बसला होता.

त्यादरम्यान एनडीआरएफच्या जवानानी प्राणाची बाजी लावून मदतकार्य केलं होतं. त्यादरम्यान माकडाला वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आज, शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने कोल्हापूरचा व्हिडीओ म्हणून पोस्ट केला आहे.