कुटुंब आणि ऑफिस यामध्ये समतोल साधताना तुम्हाला छंद जोपासण्याची किंवा त्याकडे लक्ष देण्याची संधीच मिळत नाही का? असं असेल तर मग तुम्ही ७७ वर्षांच्या आजोबांची ही कहाणी नक्की वाचली पाहिजे. हे आजोबा सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आपली पत्नी आणि संगीत यांच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम आहे.

स्वपन सेट असं कोलकातमधील या आजोबांचं नाव आहे. २००२ मध्ये स्वपन यांच्या पत्नीला गर्भाशयचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. यानंतर पत्नीच्या उपचारासाठी स्वपन यांनी देशभर फिरुन व्हायोलिन वाजवत पैसा उभा केला.

स्वपन हे चित्रकार, शिल्पकार आणि व्हायोलिन वादक आहेत. आपल्यातील कलेच्या माध्यमातून उपचारासाठी पैसे जमा करायचा असं त्यांना ठरवलं. इतकंच नाही तर १७ वर्ष ते व्हायोलिन वाजवून पैसा जमा करत होते. २०१९ मध्ये त्यांची पत्नी पूर्णपणे बरी झाली. मात्र अजूनही स्वपन अनेक शहरांमध्ये जातात आणि व्हायोलिन वाजवून लोकांचं मनोरंजन करतात. सफेद कुर्ता आणि धोतर अशा साध्या वेषात ते व्हायोलिन वाजवताना दिसत असतात.

स्वपन सेट कोलकातामध्ये एका शॉपिंग मॉलच्या बाहेर व्हायोलिन वाजवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका युजरने हा व्हिडीओ पोस्ट करताना सांगितलं आहे की, “हे स्वपन सेट आहेत…चित्रकार, शिल्पकार आणि व्हायोलिन वादक. कोलकातामधील बलराम डे मार्गावर त्यांचा स्टुडिओ आहे. २००२ मध्ये त्यांच्या पत्नीला गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. उपचार महाग असल्याने त्यांनी आपल्या पैसे गोळा करण्यासाठी आपल्या कलेचा वापर केला आणि व्हायोलिन वाजवण्यासाठी अनेक ठिकाणी प्रवास केला. त्यांनी चित्रही काढली”.

“१७ वर्षांत्या संघर्षानंतर २०१९ मध्ये त्यांची पत्नी पूर्णपणे बरी झाली असून निरोगी आयुष्य जगत आहेत. आपली कला सादर करण्यासाठी ते आजही प्रवास करतात. तिथे उभे राहून संगीत ऐकणाऱ्यांना ते फ्लाईंग किसही देतात,” असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून लोक त्यांच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव करत आहेत. पत्नी आणि आपल्या कलेवरील प्रेमासाठी लोक त्यांचं कौतुक करत आहेत. अनेकांनी तर त्यांच्याकडून व्हायोलिन शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.