या देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महिलांबाबत एखादी वाईट घटना घडली की हा मुद्दा चर्चिला जातो. त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च असते. रात्रीच तर सोडूनच द्या भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी देखील महिला सुरक्षित नाहीत. ‘हावडा मालदा इंटरसिटी एक्स्प्रेस’मधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावरून महिला किती सुरक्षित आहे आणि रोडरोमिओंना कायद्याचा किती धाक आहे हे दिसून येते.

कोलकात्यामधल्या दोन मुलींनी फेसबुकवर एक व्हिडिओ अपलोड केलाय. या मुली ट्रेनने प्रवास करत होत्या. तेव्हा त्यांच्या विरुद्ध दिशेला बसलेला एका प्रवासी या मुलींचे चोरून व्हिडिओ आणि फोटो काढत होता. आपण फोटो काढले तर कोणाला काय कळणार अशा अविर्भावात तो वावरत होता. यातल्या एका मुलीच्या ते पटकन लक्षात आलं आणि तिने त्याचा फोन खेचून घेतला. पण आपण फोटो काढतच नसल्याचा कांगावा करायला त्याने सुरूवात केली. शेवटी हे प्रकरण पोलिसांकडे नेण्याचं या धाडसी मुलींनी ठरवलं. पण पोलिसांकडे गेल्यावर या दोन्ही मुलींना यापेक्षाही वाईट अनुभव आला.

पोलिसांनी या व्यक्तीच्या मोबाईलमधले फोटो तपासले तेव्हा त्यांना या फोटोत काहीच आक्षेपार्ह वाटलं नाही, असंही या मुलीने एका इंग्रजी बेवसाईटला दिलेल्या माहितीत सांगितलं. इतकंच नाही तर तुम्ही चांगल्या घरातल्या मुली असून तक्रारारीच्या भानगडीत का पडता? त्यापेक्षा घरी जा असा फुकटचा सल्लाही पोलिसांनी दिला असल्याचा आरोप या मुलींनी केलाय. पण या मुली मागे हटल्या नाही त्या दोघींनी या व्यक्तीची रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या मुलीच्या पाठीवरचा टॅट्यू आपल्याला आवडला म्हणून आपण तिचं व्हिडिओ शुटिंग करत असल्याचं या तरुणाने नंतर पोलिसांसमोर कबूल केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या तरुणावर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी, अशी प्रतिकिया अनेकांनी दिलीये.