भारत हा मंदिराचा देश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. इतिहासाची पानं चाळली तर त्या काळची भारतीय मंदिरं ही स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना होती हे लक्षात येईल. एका दगडात कोरलेली मंदिरं, आधी कळसापासून मग पायापर्यंत खोदून काढलेली मंदिरे असे वेगवेगळे प्रकार भारताच्या विविध भागात आपण पाहिले असतील. या प्रत्येक मंदिरांच्या रचनेबरोबर तिथल्या पूजाअर्चा, विधी हे देखील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे असल्याचं पाहायला मिळतं.

मैसुर-बंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून दोन किलोमीटर आतमध्ये असंच एक आगळं वेगळं मंदिर आहे. खरतर इतर मंदिरांसारखी या मंदिराची रचना नाही किंवा बांधकामही नाही. या ठिकाणी येणारा भाविक देवाला वाहण्यासाठी फुलं, हार किंवा नैवेद्य घेऊन येत नाही तर येथे येणारे भाविक देवाला वाहण्यासाठी आपल्या जमिनीतले दगड घेऊन येतात. या मंदिराचं नाव आहे कोटीकाल्लीना काडू बसप्पा मंदिर. हे शिवाचं मंदिर आहे आणि या मंदिरात येणारा भाविक आपली इच्छा पूर्ण झाली की देवाला दगड वाहत असल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.

या परिसरातील सगळेच शेतकरी आहेत. त्यांची या देवावर श्रद्धा आहे. त्यामुळे आपली इच्छा पूर्ण झाली की ते देवळात येऊन तीन ते पाच दगड देवाला वाहतात. या परिसरात भाविकांनी वाहिलेल्या दगडांची रास पडली आहे. ही प्रथा कधी पासून सुरु झाली याचा नेमका संदर्भ सापडत नाही पण, भाविक मात्र मोठ्या भक्तीभावानं भगवान काडू बसप्पाला दगड वाहतात.