आपल्या रोखठोक मतांमुळे कायमच चर्चेत असणारा कॉमेडियन कुणाल कामराचे एक ट्विट पुन्हा चर्चेत आलं आहे. सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारविरोधात तसेच अभिनेत्री कंगना रणौतविरोधात अनेकदा उघडपणे भूमिका घेणाऱ्या कुणालने आता शेतकरी आंदोलनावरुन पुन्हा एकदा मोदी सरकार आणि कंगनाला डिवचले आहे. कुणाल कामराने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या भेटीचा संदर्भ देत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने राऊत आणि टिकैत यांच्या फोटोची तुलना दोन वाहनांशी करत अप्रत्यक्षपणे मोदी सरकार आणि कंगनावर निशाणा साधाला आहे.

कुणालने ट्विट केलेल्या फोटोमध्ये राऊत आणि टिकैत यांनी मंगळवारी गाझीपूर सीमेवर भेट घेतल्यानंतरचा फोटो वापरण्यात आला आहे. मात्र या फोटोच्या खालीच ट्रॅक्टर आणि जेसीबीचा फोटो लावण्यात आला आहे. टिकैत यांच्या फोटो खाली ट्रॅक्टर तर राऊत यांच्या फोटोखाली जेसीबी दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना कुणालने, ‘मिले सूर मेरा तुम्हारा’, असं म्हटलं आहे.

ट्रॅक्टरचा संदर्भ काय?

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून आपला विरोध नोंदवला होता. एकीकडे २६ जानेवारीला राजपथावर सालाबादप्रमाणे परेडचे आयोजन केलं असतानाच शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर परेडचं आयोजन केलं होतं. या दिवशी दिल्लीत झालेल्या हिंसेवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भात अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंगानानेही यावरुन पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनावर टीका केली होती.

नक्की वाचा >> कुणाल कामराला ‘सामना’च्या ‘त्या’ बातमीवर हवीय कंगनाची स्वाक्षरी

जेसीबीचा संदर्भ काय?

काही महिन्यांपूर्वी कंगानाचा जेव्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी करण्यावरुन शिवसेनेसोबत वाद झाला होता तेव्हा तिने मी मुंबईला येत असल्याचे सांगताना काय उखडणार ते उखडा असे शब्द वापरले होते. त्यावेळी शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मुंबई महानरपालिकेने कंगानाच्या कार्यालयावर बेकायदेशीर बांधकाम असल्याचा ठपका ठेवत कारवाई केली होती. जेसीबीच्या मदतीने महापालिकेने हे बेकायदेशीर बांधकाम पाडलं होतं. हा बांधकाम पाडताना फोटो सामनाच्या पहिल्या पानावर छापत शिवसेनेने कंगनाला डिवचलं होतं. या बातमीच्या फोटोवर कुणाल कामराने राऊत यांची विशेष मुलाखत घेतली तेव्हा त्यांचा ऑटोग्राफही घेतला होता. तसेच या पॉडकास्टच्या मुलाखतीमध्ये कुणालने राऊत यांना खेळण्यातला जेसीबी सेट भेट म्हणून देत कंगनावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.