युनायटेड किंग्डममधील केंब्रिजशायर येथील एका लॅब्रेडॉर कुत्रीने एकाच वेळी एक दोन नाही तर चक्क १४ पिल्लांना जन्म दिला आहे. या पूर्वी लॅब्रेडॉर प्रजातीच्या कुत्र्यांमध्ये एकाच मादीने एवढ्या मोठ्या संख्येत पिल्लांना जन्म दिल्याची नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे हा ब्रिटनमधील एक प्रकारचा विक्रमच असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त ‘इंडिपेंडंट’ या वृत्तपत्राने दिलं आहे.

सहा वर्षाच्या बेलाने एकाच वेळी काळ्या आणि पवळ्या रंगाच्या १४ पिल्लांना जन्म दिला. आपल्या पाळीव कुत्र्याने एकाच वेळेस एवढ्या पिल्लांना जन्म दिल्याचे पाहून मालकीण हेझल हेजेसला धक्काच बसला. पेशाने डॉग ब्रिडर असणाऱ्या हेझलला बेला सहा ते आठ पिल्लांना जन्म देईल असं अपेक्षित होतं. बेलाची चाचणी करण्यात आली तेव्हाही ती सहा पिल्लांना जन्म देईल असं सांगण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच बेलाने केंब्रिजशायरमधील वेंटवर्थमधील हेजलच्या घरातच १४ पिल्लांना जन्म दिला. बेला एकाच वेळी एवढ्या पिल्लांना जन्म देईल असं हेझलला वाटलं नव्हतं.

बेलाने जन्म दिलेल्या पिल्लांपैकी सात पिल्लं काळी असून सात पिल्लं पिवळ्या रंगाची आहेत. यापैकी चार काळी पिल्लं नर असून उर्वरित तीन मादी आहेत. तर पिवळ्यांपैकी तीन नर आणि चार मादी आहेत. बेला ज्या कुत्र्यापासून गर्भवती होती तो येथील प्राणी प्रेमीच्या केनल क्लबमधील लॅब्रेडॉर असून त्याचे नाव स्कुबी असं असल्याचे वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

यापूर्वी २०१४ मध्ये स्कॉटलंडमध्ये एका मादीने १५ पिल्लांना एकाच वेळी जन्म दिला होता. असं असलं तरी एवढ्या मोठ्या संख्येने एकाच कुत्र्याच्या पोटी एकाच वेळी १४ पिल्लांचा जन्म होण्याची ही ब्रिटनमधील पहिलीच घटना आहे. “लॅब्रेडॉर प्रजातीमध्ये असं पहिल्यांदाचं झाल्याचं मला वाटतं. आणि इंग्लंडमध्येही या पूर्वी अशाप्रकारे एकाच कुत्र्याने इतक्या पिल्लांना एकाच वेळी जन्म दिल्याची नोंद नाही,” असं हेझलने हॅडबायबलशी बोलताना सांगितलं.