पेरु या देशातील नाज्का वाळवंटामध्ये एका टेकडीवर मांजरीचे १२१ फूट उंच चित्र सापडलं आहे. एका लहानश्या टेकडीवरील कातळावर हे चित्र कोरलेलं आहे. नाज्का वाळवंटाला रहस्यमय वाळवंट असंही म्हटलं जात असल्याने या मांजरीच्या चित्राबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हे चित्र २२०० वर्ष पूर्वीचे असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही अशाप्रकारची चित्र येथे आढळून आली असून या कातळशिल्पांना येथे नाज्का लाइन्स नावाने ओळखलं जातं. ही चित्रं म्हणजे नाज्का संस्कृतीची निशाणी असल्याचे मानले जाते. जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये रेखाटण्यात आलेल्या कातळशिल्पांच्या समुहांमध्ये नाज्का लाइन्सचा समावेश होतो. यापूर्वीही अनेकदा या वाळवंटामधील कातळशिल्पांमध्ये मांजरीची चित्रं मिळाली आहेत. नुकतेच सापडलेले हे १२१ इंचाचे चित्र अलास्काहून अर्जेंटीनाला जाणाऱ्या हायवेच्या बाजूला असणाऱ्या टेकडीवर आढळून आलं आहे, असं बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नाज्का लाइन्स म्हणून ओळखली जाणारी आतापर्यंत ३०० हून अधिक कातळशिल्प पेरुमध्ये आढळून आली आहेत. या कातळशिल्पांमध्ये प्रामुख्याने प्राणी आणि ग्रह ताऱ्यांचा समावेश असल्याचे दिसते. इतिहास संशोधक असणारे जॉनी इस्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे २२०० वर्षांपूर्वी लोकांनी कोणत्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता एवढ्या मोठ्या आकाराच्या चित्रांची निर्मिती केली आहे हे कोणालाही आश्चर्य वाटण्यासारखचं आहे.

दुसऱ्या एका कातळशिल्पाचा शोध घेण्यासाठी साफसफाई करत असतानाच टेकडीवर काही रेषा दिल्या आणि त्यामधूनच या मांजरीच्या कातळशिल्पाचा शोध लागल्याचे इस्ला सांगतात. या चित्रापुर्वीही आम्हाला अशाप्रकारची काही कातळशिल्प आढळून आली आहेत आणि अजूनही बरीच आम्हाला सापडतील अशी आशा आहे. या मांजरीच्या कातळशिल्पाचा फोटो आम्ही ड्रोनच्या मदतीने काढला, असंही इस्ला म्हणाले.

पेरुतील संस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हे मांजरीचे कातळशिल्प सापडले तेव्हा ते स्पष्टपणे दिसत नव्हतं. हे चित्र जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर होते. टेकडीचा उतार असणाऱ्या भागावर हे चित्र रेखाटण्यात आल्याने ते नष्ट होण्याची शक्यता अधिक होती असं स्पष्ट करण्यात आलं आहे. अनेक आठवडे या टेकडीवर साफसफाईचे काम करण्यात आल्यानंतर हे चित्र आता स्पष्टपणे दिसत असल्याचे पेरुतील संस्कृतील मंत्रलायच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. हे चित्र १२ ते १५ इंच जाड रेषांनी तयार करण्यात आला आहे. इसवी सनपूर्वी ५०० ते इसवीसन २०० च्या दरम्यानच्या कालावधीमध्ये हे चित्र रेखाटण्यात आल्याची शक्यता इस्ला यांनी व्यक्त केलीय.