अंगावर फक्त एक तोकडी पँट आणि डोक्यावर राजमुकूट अभिमानानं मिरवणाऱ्या या राजाला पाहिल्यावर अनेकांना कुतूहल वाटतं. विशेष म्हणजे कोणी त्याच्या वाळूच्या किल्ल्याभोवती गोळा झालं की हा ‘राजा’ आपल्या  ‘सिंहासना’वर बसून फोटोकरता पोज देण्यासाठी नेहमीच तयार असतो. त्याच्या अशा राहणीमानामुळे सगळेच त्याला ‘द किंग’ म्हणजे ‘राजा’ म्हणून संबोधतात. २२ वर्षांपासून ब्राझीलच्या वारा दा तिजुका किनाऱ्यावर या राजाचं वास्तव्य आहे.

‘कचऱ्याच्या ढिगातून उपसलेल्या सडक्या पदार्थांवर आमचा उदरनिर्वाह’

या राजाचं मुळ नाव मार्किओ मॅटोलिआज. त्याचं वय आहे ४४ वर्षे. २२ व्या वर्षांत तो या किनाऱ्यावर राहायला आला. वाळूपासून किल्ला तयार करण्याची कला मार्किओला अवगत आहेत. त्यामुळे त्यानं किनाऱ्यावर किल्ला बांधला आणि त्याच्या शेजारी तो राहू लागला. त्याच्याजवळ पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. त्याच्याजवळची पुस्तकं आणि एकंदर त्याचं राहणीमान पाहून किनाऱ्यावर येणारे पर्यटक नेहमीच त्याच्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे आपल्या वाळूच्या छोट्याशा घरात डोकावण्याची किंवा तिथे राहण्याची अनुमती तो पर्यटकांना देतो. अर्थात त्या बदल्यात काही पर्यटक मार्किओला पैसेही देतात. यात त्याचा दिवस आनंदात जातो.

वाचा : टोल वाचविण्यासाठी मुंबईकराने चालवली अनोखी शक्कल

मार्किओला कुटुंब नाही. काही पुस्तकं आणि वाळूचा किल्ला इतकंच त्याच्याजवळ आहे. आपला वाळूचा किल्ला ढासळू नये म्हणून तो सतत त्याची डागडुजी करत असतो. तापमान वाढलं की मार्किओसाठी ही चिंतेची बाब असते कारण यामुळे आपला किल्ला ढासळेल अशी भिती त्याला वाटते म्हणूनच पाणी शिंपडून किल्ला थंड करण्याचा तो प्रयत्न करतो.