YouTube वर हॅकिंग शिकून एका ११ वर्षांच्या लहानग्याने स्वतःच्या वडिलांकडेच तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतक्यावरच हा मुलगा थांबला नाही, तर मागणी पूर्ण न झाल्यास कुटुंबाचा वैयक्तिक तपशील आणि अश्लील फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याचीही धमकी त्याने दिली होती.

उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये हा प्रकार घडलाय. एका आठवड्यापूर्वी गाजियाबादच्या वसुंधरा कॉलनीत राहणाऱ्या एका व्यक्तीला ई-मेलद्वारे धमकी मिळाली. जर १० कोटी रुपये नाही दिले तर तुमचे अश्लील फोटो सार्वजनिक केले जातील, असं त्या ई-मेलमध्ये म्हटलं होतं. या धमकीनंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला. ‘१ जानेवारी रोजी ई-मेल आयडी हॅक झाला होता आणि हॅकरने ई-मेल आयडीचा पासवर्ड बदलला, शिवाय मोबाईल नंबरही रिसेट केला होता. त्यानंतर हॅकर्सच्या ग्रुपकडून धमकी देणारा ई-मेल मिळाला’, असं त्यांनी पोलिसांनी सांगितलं. हॅकर दैनंदिन जीवनावर नजर ठेवून आहे आणि सातत्याने मला व माझ्या कुटुंबियांना त्रास देत असल्याचंही वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

5 वर्षांचा चिमुकला वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट चालवतोय Land Cruiser, व्हायरल व्हिडिओ बघून नेटकरी हैराण

पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला आणि ई-मेल पाठवणाऱ्याचा ‘आयपी अ‍ॅड्रेस’ शोधल्यावर ते हैराण झाले. कारण तो धमकीचा ई-मेल तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्याच घरातील ‘आयपी अ‍ॅड्रेस’वरुन पाठवण्यात आला होता. संशय आल्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीच्या ११ वर्षीय मुलाकडे चौकशी केली आणि पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. आता पोलिस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायेत की, अखेर पाचवीत शिकणाऱ्या मुलाने हा गुन्हा का केला. मुलाला काही दिवसांपूर्वीच कम्प्यूटर ऑनलाइन क्लासमध्ये सायबर क्राइमबाबत शिकवलं होतं. शिवाय सायबर क्राइमपासून कसा बचाव करावा याचीही माहिती देण्यात आली होती. त्यानंतर या मुलाने युट्यूबवर हॅकिंगशी निगडीत अनेक व्हिडिओ बघितले. हॅकिंगबाबतची सर्व माहिती गोळा केल्यानंतर त्याने पहिल्यांदा वडिलांचाच ई-मेल आयडी हॅक केला आणि त्यांना धमकीचे ई-मेल पाठवण्यास सुरूवात केली. पोलिस सध्या या मुलाकडे मित्रांना किंवा नातेवाईकांनाही अशाप्रकारची धमकी देणारे ई-मेल पाठवले होते का याबाबत चौकशी करत आहेत. तसेच, शाळेत संपर्क साधून ऑनलाइन क्लासमध्ये नेमकं काय शिकवण्यात आलं याबाबतही जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.