मुलुंडमधील स्वप्ननगरी परिसरातील रेडवूड सोसायटीच्या मागे बिबटय़ाला पकडल्याची एक ध्वनिचित्रफीत सोमवारपासून समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाली आहे. वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबटय़ाला दोरीच्या साहाय्याने बांधून नंतर त्याला पिंजऱ्यात टाकण्यात येत असल्याचे ध्वनिचित्रफितीत दिसत आहे. परंतु ही घटना मुलुंडमधील नसून रत्नागिरी जिल्ह्य़ातील राजापूर येथील आहे. याशिवाय ही ध्वनिचित्रफीत जुनी आहे. रत्नागिरीतील जंगलात मे महिन्यात ही कारवाई करण्यात आली. तीन वर्षे वयाचा बिबटय़ा सापळ्यात अडकल्याची माहिती राजापूर परिसरातील गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हा बिबटय़ा जाट जातीचा नर होता. गेले काही महिने या परिसरात बिबटय़ाची दहशत निर्माण झाल्याने गावकऱ्यांना बाहेर फिरणे मुश्कील झाले होते. त्यामुळे अखेर वनाधिकाऱ्यांनी ही कारवाई हाती घेतली. या बिबटय़ाला पकडणारे प्रादेशिक वनाधिकारी नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ही कारवाई मुलुंडमधील नसून ती केवळ अफवा आहे.