तिला ‘वसुंधरेची प्रवासी’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिने जगभरातील सर्व देशांना भेट दिली असून, असा कारनामा करणारी ती सर्वात तरूण प्रवासी ठरली आहे. या अमेरिकन तरूणीने वयाच्या २१ व्या वर्षीच जगातील सर्व देशांना भेट दिली आहे. ३१ मे रोजी उत्तर कोरिआला भेट देऊन लेक्सी अलफॉर्डने प्रवासाचा शेवटचा टप्पा गाठला. याआधी जेम्स अशक्विथने वयाच्या २४ व्या वर्षी हा कारनामा करून ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदविले होते. आता लेक्सीने त्याची जागा घेतली आहे.

लेक्सीच्या कुटुंबाची कॅलिफोर्नियात ‘ट्रॅव्हल एजन्सी’ असल्याने लहानपणापासूनच प्रवास अथवा भटकंती हा तिच्या आयुष्याचा महत्वाचा भाग राहिला आहे. मला आठवतदेखील नाही तेव्हापासूनच ‘प्रवास’ माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिला असल्याचे सांगत आई-वडील तिच्यासाठी स्वयंशिक्षणाचा पर्याय निवडत काही आठवडे अथवा महिन्याभरासाठी शाळेतून सुट्टी घेत दरवर्षी त्यांच्यासोबत घेऊन जात असल्याच्या आठवणीला तिने फोर्ब्स मासिकाला दिलेल्या मुलाखतीत उजाळा दिला.

वयाच्या अठराव्या वर्षीच तिने ७२ देशांची भ्रमंती केली होती आणि यातूनच गिनिज बुकमध्ये रेकॉर्ड नोंदविण्याची कल्पना तिच्या डोक्यात आली. शिक्षण आणि प्रवास यांचा सुवर्णमध्य साधत गिनिज बुकमध्ये नाव नोंदविण्यासाठी पूर्णपणे झोकून दिल्याचे तिने फोर्ब्स मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

स्वत:च्या आराम कोशातून बाहेर पडत, स्वप्नांची पुर्तता आणि ध्येय गाठण्यासाठी कष्ट करण्याचा सल्ला या ‘प्रवास-परी’ने भटकंतीची आवड असलेल्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.