‘दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ’ ही म्हण साऱ्यांनाच ठाऊक असेल. तसाच काहीसा प्रत्यय दक्षिण आफ्रिकेमधील एका नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळाला. एका म्हशीची शिकार केल्यानंतर तिला खाण्यासाठी पाच सिंहांमध्ये भांडण सुरु झालं आणि या भांडणामध्ये म्हैस मात्र पळून गेली. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून अनेकांनी या म्हशीच्या चातुर्याचं कौतुक केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेमधील क्रुगर नॅशनल पार्कमध्ये पाच सिंहांनी एका म्हशीला शिकारीसाठी धरलं. त्यानंतर या म्हशीला खाण्यासाठी पाचही सिंहांमध्ये झटापट सुरु झाली. थोड्याच वेळात या झटापटीचं रुपांतर भांडणामध्ये झालं. विशेष म्हणजे या सिंहांचं भांडण पाहून योग्य संधी साधत म्हैस तेथून पळून गेली. या घटनेचा व्हिडीओ भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण कासवान यांनी शूट केला असून तो सोशल मीडियावर शेअर केला.

“या सिंहांना चांगलाच धडा मिळाला असेल. यांना जेवण करण्यापूर्वी भांडण करणं महत्त्वाचं वाटत होतं आणि या गडबडीत जेवण मात्र पळून गेलं”, असं कॅप्शन या व्हिडीओला प्रवीण यांनी दिलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून आतापर्यंत त्याला २ हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि ६०० पेक्षा अधिक रि-ट्विट मिळाले आहेत. तर १७ हजार व्ह्युज मिळाले आहेत.