महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मीरजमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकच्या उत्तरेकडी भागात म्हणजेच महाराष्ट्रालगतच्या सीमा भागामध्ये जोरदार पाऊस पडत असून तेथेही जागोजागी पाणी साठल्याचे दिसत आहे. या सर्व पूर परिस्थितीचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत असून अनेक व्हिडिओमध्ये नागरिकांना होणाऱ्या अचडणी आणि बचावकार्य सुरु असल्याचे दिसत आहे. याच भागातील बेळगावमधील एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिक मुले पुराच्या पाण्यामध्ये ‘फू बाई फू’ गाणं लावून डिजेच्या तालावर थिरकताना दिसत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘निप्पाणी-कोल्हापूर महामार्गावरील यामगारणी गावामध्ये साचलेल्या पुराच्या पाण्यामध्ये स्थानिकांनी केलेला डान्स’, असे कॅप्शन या व्हिडिओ देण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये अनेक तरुण मुलं कंबरेएवढ्या  पाण्यामध्ये ‘फू बाई फू’ आणि डिजेवर लावलेल्या इतर गाण्यांवर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी पूर परिस्थितीमध्येही असा आनंद व्यक्त करणाऱ्या या मुलांचे कौतुक केलं आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ

दरम्यान, कोल्हापूरबरोबरच पुणे, सांगली भागांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.