मे महिन्यात जगभरात धुमाकूळ घातलेला रॅनसमवेअर व्हायरस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांना या सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी या व्हायरसमुळे जगातील अनेक देशांतील इंटरनेट सुविधा कोलमडल्या होत्या. ब्रिटन, रशिया, युक्रेन, भारत, चीन, इटली व इजिप्त या देशांना या हल्ल्याचा फटका बसला होता. आता त्याच स्वरुपाचा लॉकी सायबर सक्रिय झाला आहे. गुन्हेगारांनी या व्‍हायरसला पुन्‍हा सक्रिय केले असून भारतातील संगणकांवरही तो हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ई-मेलच्या माध्यमातून हा हल्ला होऊ शकतो, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.

लॉक व्हायरस संगणकावर हल्ला करून संगणकाची संपूर्ण यंत्रणा लॉक करतो. यामुळे संगणकातील सर्व फाईल्स, फोटो लॉक होण्याचा धोका आहे. व्हायरसच्या हल्ल्यामुळे बंद झालेला संगणक पुन्हा सुरू करण्यासाठी जवळपास दीड लाख रुपयांच्या आसपास रकमेची मागणी सायबर गुन्हेगारांकडून केली जात आहे. मागच्यावेळी झालेल्या हल्ल्यात मंत्रालयातील जवळपास १५० हून अधिक संगणक बंद पडले होते. यासंदर्भात केंद्र सरकारशी संलग्न असलेल्या इमर्जन्सी रिस्पाँस टीम ऑफ इंडिया (सीईआरटी-इन)ने तात्काळ या हल्ल्याबाबत काळजी घेण्याचा रेड अलर्ट जारी केला होता.

रॅनसमवेअर म्हणजे काय?

रॅनसमवेअर हे संगणकात बिघाड करणारे सॉफ्टवेअर असून, त्यामुळे संगणकाचा वापर करणे कठीण होऊन बसते. खंडणी दिल्यावर तुमचा संगणक मोकळा करून दिला जातो. यात ठराविक रक्कम घेऊन तुमच्या अडकलेल्या फाइल्स मोकळय़ा करून दिल्या जातात. हे एक प्रकारचे मालवेअर असून ते ईमेलच्या माध्यमातून पसरवले जाते. या मालवेअरचे नाव वॉनाक्राय किंवा वॉना डिक्रिप्टर असून तो खंडणी उकळणारा प्रोग्रॅम आहे. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज सिस्टीमवर तो हल्ला करू शकतो.

काय काळजी घ्याल?

१. तुमच्या संगणकातील सर्व फाईल्सचा बॅकअप घ्या.
२. न चुकता अॅंटीव्हायरसचा वापर करा.
३. संशयास्पद ई-मेल आणि वेबसाईटसपासून सावध राहा.
४. रॅनसमपासून सुटका करुन घेण्यासाठी कोणतीही रक्कम देऊ नका.
५. पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधून आवश्यक ती प्रक्रिया करा.