आयुष्यामध्ये पैसा महत्वाचा असतो. म्हणजे आपण लहानपणापासून शिक्षण घ्यायला सुरूवात केल्यानंतर आपल्याला चांगले शिक्षण घेऊन चांगला काम-धंदा करुन पैसे कमवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आपण एकदा का पैसे कमवू लागलो की पैशांबरोबरच आपल्याला वेळोवेळी पाठिंबा देणारे, आधार देणारा कुटुंबिय आणि मित्र परिवारही तेवढाच महत्वाचा असल्याचे जाणीव होते. कितीही पैसा कमावला तरी एकटेपणा सतत खात राहतो असं सांगणारी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच की काय या एकटेपणापासून वाचण्यासाठी न्यूझीलंडमधील एका अब्जाधिशाने त्याच्याबरोबर राहण्यासाठी दहा चांगले लोक हवे असल्याची जाहिरातच दिली आहे.

न्यूझीलंडमधील एक यशस्वी उद्योजक असणाऱ्या कार्ल रिपेन या ७० वर्षीय अब्जाधिशाने ही जाहिरात दिली आहे. कॅन आईस कॉफी विकणाऱ्या कंपनीचे मालक असणाऱ्या कार्ल यांनी त्यांच्या न्यूझीलंडमधील स्वर्गासारख्या घरामध्ये राहण्यासाठी दहा चांगले लोक हवे आहेत अशी जाहिरात छापली आहे. कार्ल हे सध्या त्यांच्या राजवाड्यासारख्या भव्यदिव्य घरात स्वत: बरोबर रहाण्यासाठी वय वर्षे १८ ते ७० मधील व्यक्तीचा शोध घेत असल्याचं ‘फॉक्स न्यूज’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

कार्ल यांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये ते सध्या ज्या ठिकाणी आहेत तिथे पोहचण्यासाठी मागील दहा वर्षांमध्ये त्यांनी काय काय कष्ट घेतले आहेत याबद्दल माहिती दिली आहे. कार्ल यांचा प्रवास कुठून सुरु झाला हे सांगतानाच सध्या ते शेतांमध्येच काम करणे पसंत करत असल्याचे या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं आहे.

कार्ल यांनी सध्या आपल्या मोठ्या घरामध्ये दहा लोकं राहू शकतात असं जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. एक छान वायनरी तेथे असून येथे संध्याकाळी एकत्र भेटण्याचा सुखद अनुभव घरातील सर्वांना घेतला येईल, असं कार्ल जाहिरातीमध्ये म्हणतात. ‘काही भन्नाट लोकांबरोबर एकत्र राहण्याचा तुमचा विचार असेल तर ही संधी म्हणजे तुमच्यासाठी नवीन आयुष्याची एक सुरुवात असू शकते,’ असं या जाहिरातीमध्ये कार्ल यांनी म्हटलं आहे.

“आता मी पुरेसा पैसा कमावला आहे. त्यामुळे आता मला माझे स्वर्गासारख्या घरामध्ये राहण्यासाठी दहा जणांची (पुरुष आणि महिला कोणाही) गरज आहे. एका रुममध्ये दोन याप्रमाणे हे दहा लोक राहतील. या लोकांना भेटीगाठीसाठी आणि गप्पा मारण्यासाठी येथे एक छान वायनरी आहे. जर कोणाला स्वत:चे घोडे घेऊन या ठिकाणी रहायला यायचं असेल तर ते येऊ शकतात,” असं कार्ल यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलं आहे.

‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कार्ल यांच्या संपत्तीमध्ये घोड्यांचा तबेला, वायनरी, तासमान समुद्र किनारा पाहता येईल अशा ठिकाणी असलेले घर या गोष्टींचा समावेश आहे. या ठिकाणी राहणाऱ्यांना भटकंती, मासेमारी, शॉपिंग, कायाकिंग, पक्षी निरिक्षण, पोहणे आणि प्राणी दर्शन करात येईल, असं बातमीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार कार्ल यांची संपत्ती एकूण ५५० एकरांवर परसलेली आहे. “अवाकीनो इस्टेट” असं त्यांच्या या प्रॉपर्टीचं नाव असून ती न्यूझीलंडच्या पश्चिमेकडील एका बेटावर आहे. या संपत्तीची किंमत ५६ लाख रुपये इतकी असल्याचे ‘द गार्डियन’च्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.