जानेवारी महिन्यात भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापल्यास अर्थव्यवस्था सुधारेल असा सल्ला दिला होता. त्यावरुन त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र हे तुम्हाला ठाऊक आहे का? की जगातला एक असा देश आहे तोही मुस्लीमबहुल देश ज्या देशातल्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो छापण्यात आला आहे. होय जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामधल्या नोटेवर गणपतीचा फोटो छपाण्यात आला आहे. इंडोनेशिया येथील चलन भारतातील चलनासारखेच आहे. या देशातला व्यवहार हा रुपयांमध्येच होतो. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतो आहोत अशा देशाची गोष्ट ज्या देशात नोटांवर गणपतीचा फोटो छापण्यात आला आहे.

२० हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो
इंडोनेशियामधील २० हजार रुपयाच्या नोटेवर पुढच्या बाजूला गणपती बाप्पाचा फोटो आहे. तर मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. यासोबतच नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था ढासळली. त्यानंतर प्रचंड विचार करुन २० हजाराची नोट चलनात आणण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाल्यानंतर या नोटांवर गणपतीचा फोटो छापण्याचाही निर्णय झाला. यावर लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली.

इंडोनेशिया हा जगातला असा देश आहे की त्या देशातल्या एकूण लोकसंख्येच्या ८७ टक्के लोक हे मुस्लीम आहेत. तर या देशात हिंदूंचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. या देशातल्या २० हजाराच्या चलनी नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गणपतीला या देशात कला, विज्ञान, शिक्षण याची देवता मानलं जातं. जेव्हापासून २० हजाराच्या चलनी नोटांवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून या देशाची अर्थव्यवस्था ढासळली नाही अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.