प्रवासात सहप्रवाशांच्या घोरण्याचा त्रास अनेकांना होतो. घोरण्याची समस्या ही नैसर्गिक त्यामुळे सहप्रवाशांना आपण बोलणार तरी काय? तेव्हा कानात बोळे घालून याकडे दुर्लक्ष करण्यापलिकडे आपल्याकडे काही पर्यायच नसतो. पण पवन एक्स्प्रेसमध्ये मात्र घोरणाऱ्या प्रवाशाला इतर प्रवाशांनी चक्क दिवसभर जागं ठेवल्याचा हास्यास्पद प्रकार घडला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनन्सवरून धारबंगाला निघालेल्या पवन एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला इतर प्रवाशांनी संध्याकाळपर्यंत जागं ठेवलं असल्याचं मुंबई मिररनं आपल्या बातमीत म्हटलं आहे. रामचंद्र असं या प्रवाशाचं नाव असून पहाटे ४ वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत सहप्रवाशानं त्यांना झोपू दिलं नाही. यावेळी बोगीत जवळपास १० माणसं होती. रामचंद्र यांच्या घोरण्याचा आवाज जास्त असल्यानं इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. त्यांची झोपमोड होत होती त्यामुळे प्रवाशांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. बोगीत सुरू असलेला गोंधळ पाहून तिकीट तपासनिस गणेश विरा तिथे पोहोचले. प्रवाशाची झोपमोड करणं योग्य दिसत नाही असं त्यांनी इतर प्रवाशांना समजावले. पण घोरणाऱ्या रामचंद्र यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी लावून धरली.

अखेर तडजोड करत रामचंद्र यांनी पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळपर्यंत न झोपण्याचं मान्य केलं. यामुळे प्रवासात आठ ते दहा जणांना शांतपणे झोपता आलं. अनेकदा घोरण्यामुळे सहप्रवाशांना त्रास होतो आणि यामुळे गाडीत भांडणं होतात. दर महिन्यात अशी एक तरी तक्रार आमच्याकडे येते असंही विरा यांनी ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या प्रतिक्रीयेत सांगितले.