सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रोल होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. विशेष म्हणजे नेटकरी आपल्याला न पटलेल्या घटनेचा समाचार घेण्यासाठी हे एक उत्तम माध्यम समजतात. आता हेच पाहा ना एका तरुणीने आपल्या घरी आलेल्या कस्टमर केअरच्या तरुणाकडून सर्व्हिस घेणे नाकारले. याचे कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. हा तरुण मुस्लिम असल्याने या मुलीने त्याच्याकडून सेवा घेण्यास नकार दिला. इतकेच नाही तर लखनौमध्ये राहणाऱ्या या मुलीने सोशल मीडियावरही यावर आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिचा चांगलाच निषेध केला आहे.

या तरुणीने एअरटेलला ट्विट करत आपल्या घरी कस्टमर केअरचा हिंदू प्रतिनिधी पाठवा अशी मागणी केली. आपण मुस्लिम प्रतिनिधीकडून सेवा घेणार नसल्याचे तिने यामध्ये म्हटले आहे. या मुस्लिम प्रतिनिधीचे नाव घेऊन आपल्याला त्याच्या कामावर भरोसा नाही असेही तिने म्हटले आहे. या तरुणीचे नाव आहे पूजा सिंह. तिच्या घरी असलेल्या एअरटेल डिजिटल या टीव्ही कनेक्शनला अडचण येत असल्याने तिने कस्टमर केअरमध्ये तक्रार दाखल केली. तिच्या घरी जाण्यासाठी कंपनीने शोएब नावाच्या इंजिनिअरची निवड केली. हे कळाल्यावर पूजाने हे वादग्रस्त ट्विट केले. आपल्याला मुस्लिमांच्या कामावर भरोसा नाही. कुराणमध्ये कस्टमर सर्व्हीससाठी वेगळ्या गोष्टी असतील त्यामुळे मला या तरुणमाकडून कोणतीही सेवा नको आहे.

पूजाने केलेल्या या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी तिचा निषेध करत तिला चांगलेच ट्रोल केले. काहींनी तिला कट्टरपंथी म्हटले तर काहींनी तिला मनोविकारतज्ज्ञाकडे जाण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. काहींनी तर तिला अपशब्दही वापरले. कंपनीने तिला उत्तर देताना म्हटले, ”आपण ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात कधीच जाति-धर्मावरुन भेदभाव करत नाही. कॉलच्या वेळी जो प्रतिनिधी उपलब्ध असतो त्याला आपण पाठवतो.” सोशल साईटवर अशाप्रकारे वाद झाल्यानंतर पूजानेही आणखी एक पोस्ट करत आपल्या वागण्यामागचे कारण सांगितले. ती म्हणाली, ”माझा या आधीचा अनुभव अतिशय वाईट होता. म्हणून मी मुस्लिम प्रतिनिधीला न पाठविण्याची विनंती केली होती. मात्र यानंतर लोक मला इतके वाईट बोलतील याची मला कल्पना नव्हती. पण मी पहिल्यापासून बरोबर होते हे नक्की.”