भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य सेवांचा तुटवडा जाणवू लागला आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नसून अनेक ठिकाणी रुग्णलयांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. त्यातच औषधांपासून ते बेड्स मिळवण्यापर्यंत अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात असल्याचंही समोर येत आहे. असाच एक प्रकार मध्य प्रदेशमधील आगर मालवा जिल्ह्यात समोर आला. थेट संत्र्याच्या बागेमध्ये एकाने रुग्णांना उपचार देण्यास सुरुवात केली. एका बनावट डॉक्टरने काही रुग्णांना थेट संत्र्याच्या बागेमध्येच उपचार देण्यास सुरुवात केली. झाडांच्या फांद्यांना साईन लटकवून हा डॉक्टर या महिला रुग्णांना ग्लुकोजही देत होते. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहचले असता तो डॉक्टर तिथून फरार झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारी अधिकारी घटनस्थळी पोहचले तेव्हा त्यांना झाडाखाली कार्डबोर्डची अंथरुण करुन त्यावर पडलेल्या महिलांना झाडाच्या फांद्यांना लटकवलेल्या सलाईनमधून ग्लुकोज देण्यात येत असल्याचं दिसलं. याच परिसरामध्ये अधिकाऱ्यांना सीरिंज आणि औषधांची अर्धवट जळालेली बिलंही सापडली. करोनासंदर्भात आता ग्रामीण भागातही मोठ्याप्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी लोक सरकारी रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करत आहेत. आपण सरकारी रुग्णालयांमध्ये गेलो तर आपली करोना चाचणी करुन आपल्याला रुग्णालयात दाखल करतील अशी भीती ग्रामीण भागातील जनतेला आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी ग्रामीण भागात आता खोट्या डॉक्टरांच्या मदतीने उपचार करण्याला नागरिक प्राधान्य देताना दिसत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खुल्या जागी रुग्णांवर उपचार करणे नियमांचे उल्लंघन करण्यासारखं आहे. सध्या या डॉक्टरचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.

ब्लॉक मेडिकल ऑफिसर असणाऱ्या मनीष कुरील यांनी बीबीसीशी बोलताना डिग्री नसताना अशाप्रकारे लोकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर आम्ही कारवाई करत असल्याचं सांगितलं. यापूर्वीच आम्ही अशा नकली डॉक्टरांना करोना काळामध्ये रुग्णांच्या जीवाशी न खेळता, तुमच्याकडे रुग्ण आल्यास त्यांना रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला द्यावा असं आवाहन केलं होतं. सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणं असणाऱ्यांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात यावं. तिथे करोना चाचणी नकारात्मक आल्यानंतर स्थानिक डॉक्टर रुग्णांवर उपचार करु शकतात, असे निर्देश सर्व डॉक्टरांना देण्यात आल्याचं कुरील म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh agar malwa fake doctor makes hospital in orange garden run away after team arrived scsg
First published on: 07-05-2021 at 08:16 IST