वर्षभरापूर्वी शोभा डेंसह सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरलेले मध्य प्रदेशचे पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांनी आपले ६५ किलो वजन घटवले आहे. गेल्यावर्षी झालेल्या महापालिका मतदानाच्या काळात शोभा डे यांनी ट्विटरवर दौलतराम यांचा फोटो शेअर करून त्यांची खिल्ली उडवली होती. दौलतराम यांचा लठ्ठपणा तेव्हा सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरला होता. ही थट्टा दौलतराम यांच्या जिव्हारी लागली होती त्यानंतर पुढच्या काही महिन्यांत आपण नक्कीच फिट पोलीस निरीक्षक होऊ असं तसं त्यांनी ठामपणे सगळ्यांना सांगितलं होतं.

दौलतराम यांच्यावर नुकतीच मुंबईतली एका खासगी रुग्णालयात बॅरियाटिक सर्जरी करण्यात आली आणि त्यांनी जवळपास ६५ किलो वजन कमी केले. त्यांचे आधिचे वजन १८० किलो होते. पित्ताशयाचा आजार असल्याने तसेच शरीरातील इन्सुलिनचेही प्रमाण वाढल्यानंतर आपले वजन झपाट्याने वाढले असल्याचे त्यांनी सांगितले होते. आपल्या शरीरामुळे आपण सोशल मीडियावर ट्रोल होत आहोत हे कळताच पुढच्या १८ महिन्यात आपण नक्कीच वजन घटवण्याचा प्रयत्न करू असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात त्यांनी ६५ किलो वजन कमी केले आहे. पुढच्या सहा महिन्यात ३० किलो वजन कमी करणार असल्याचंही ते म्हणाले. बॅरियाटिक सर्जरीमुळे त्यांचे वजन १८० किलोंवरून ११५ किलो झाले आहे.

इतकंच नाही तर त्यांनी शोभा डे यांचे आभारही मानले आहेत. जर त्यांनी माझी खिल्ली उडवली नसती तर वजन घटवण्याचे मी कधी मनावरही घेतले नसते असंही ते म्हणाले. इतकंच नाही तर शोभा डे यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाला शोभा डे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानायचे आहेत अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी शोभा डे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘हेव्ही बंदोबस्त इन मुंबई टुडे’ असं ट्विट करत दौलतराम यांचा फोटो ट्विट केला होता. तसेच हा फोटो मुंबई पोलिसांचा असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या. पण वेळीच मुंबई पोलिसांनी हा फोटो मध्य प्रदेशमधील पोलिसाचा असल्याचं सांगत शोभा डेंना प्रत्युतर दिले होते. यामुळे शोभा डे ट्रोल झाल्या होत्या.