जगभरात थैमान घालणारा करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असतानाच, दुसरीकडे राज्यभा निडणुकीचा बिगुल वाजला. आज, शुक्रवारी देशभरातील आठ राज्यांधील १९ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडत आहे. मध्यप्रदेशमधील तीन जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी मध्यप्रदेशमधील जनतेला खास दृष्य पाहायला मिळाले.

काँग्रेस पक्षाच्या एका करोना पॉझिटिव्ह आमदाराने पीपीई किट घालून आपला हक्क बजवला. त्या आमदाराचे नाव कुणाल चौधरी असे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून ते उपचार घेत होते. मात्र, या मोक्याच्या क्षणी त्यांनी पीपीई किट घालून मतदान करत पक्षासाठी योगदान दिलं. कुणाल चौधरी यांनी मतदान केल्यानंतर विधानसभेचा संपूर्ण विभाग सॅनेटाइझ करण्यात आला, तसेच मेन गेटही सॅनेटाइज करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा व काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत जवळपास सहा आमदारांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसवरील संकट अधिकच गडद झाले. मध्य प्रदेशमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाकडून ज्योतिरादित्य सिंधिया आणि सुमेर सिंह सोलंकी तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह व फूल सिंह बरैया यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल किंवा कोरोनाची लक्षणे त्यात आढळली तर त्या व्यक्तीने विलगिकरणात राहणे बंधनकारक असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हणत टीका केली आहे. मात्र, काहींनी संपूर्ण काळजी घेत मतदान केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव पाडला आहे.