भीमा-कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहे. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आक्रमक झाले असून जाळपोळ, दगडफेक, रेल रोकोच्या घटना मुंबईत घडल्या आहे. दुपारच्या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी घाटकोपर स्थानकातही रेल रोको केलं. यामुळे मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक प्रवासी घाटकोपर विक्रोळीदरम्यान अडकले होते. ट्रेनमध्येच थांबल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

तासन् तास ट्रेन रुळावरुन हलण्याची चिन्ह दिसत नव्हती. अशावेळी प्रवाशांनी ट्रेनमधून उतरत चालत जाणं पसंत केलं. ट्रेनमध्ये अडकलेल्या महिला, विद्यार्थ्यांनी पायपीट करत पुढचं स्टेशन गाठलं. प्रवाशांना झालेला त्रास पाहून रेल्वेरुळाजवळ असणाऱ्या वस्त्यांमधली काही तरुण मंडळी प्रवाशांच्या मदतीला धावून आली आणि मुंबईकरांचं स्पिरीट पुन्हा एकदा या निमित्तानं दिसलं. यामध्ये परवीन नावाचा स्थानिक तरूणही होता. प्रवाशी उन्हातून चालत जात आहेत कित्येक लोक तहानलेले आहेत हे कळताच परवीन आणि त्यांच्याबरोबर शेजारच्या वस्तीतली आणखी काही लोक मदतीसाठी धावून आली आणि त्यांनी प्रवाशांना मोफत पाणीवाटप केलं. ठिकठिकाणी प्रवाशांसाठी पाण्याचे हंडे ठेवले होते. वस्तीतले अनेक लोक प्रवाशांना पाणी भरून देत होते.