१२ मे २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची हाक दिली, तेव्हापासून त्याबाबतची चर्चा सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी पाच टप्प्यांमध्ये २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचा तपशील सादर केला. या पॅकेजला आत्मनिर्भर भारत पॅकेज असे नाव दिलं गेलं होतं. केंद्र सरकाकडून आत्मनिर्भर भारतबद्दल जनतेला सांगितले जातं आहे. आत्मनिर्भर भारत मागील उद्देश लोकांसमोर मांडला जात आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आत्मनिर्भर भारतबद्दल माहिती देताना त्याच आत्मनिर्भर शब्दाचा उच्चार चुकला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हाच धागा पडकून महाराष्ट्र काँग्रेसने अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. अमित शाह यांनी आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील हा व्हिडिओ असल्याचे दिसतेय. या व्हिडिओत अमित शाह आत्मनिर्भर भारत बद्दल बोलत आहे. मात्र, याच शब्दाचा उच्चर करताना अमित शाह अडखळले. आत्म भारत निर्माण असा उच्चार दोन ते तीन वेळा करतात. काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करताना लोकांना प्रश्न विचारलाय की, ‘ज्यांना आत्मनिर्भर बोलताही येत नाही, ते देशाला आत्मनिर्भरता शिकवू शकतात का?’

महाराष्ट्र काँग्रेसने व्हिडिओ शेअर केल्यानंतर नेटकरऱ्यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी काँग्रेसवर टीका केली तर काहींनी भाजपाला लक्ष केलं.