देशात गेल्या काही दिवसांपासून करोना लसीच्या पुरवठ्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसीचा अपुरा पुरवठा केला जात असल्याचा दावा वारंवार महाराष्ट्र सरकारकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर टीका करणारं भलंमोठं पत्रच जारी केलं. त्यानंतर या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशा वादाचं चित्र निर्माण झालं असून आता हा वाद इंटरनेटवर देखील दिसू लागला आहे. हा वाद वाढू लागल्यानंतर नेटिझन्सनी आपली मतं मांडण्यासाठी ट्विटरवर #MaharashtraNeedsVaccine या हॅशटॅगखाली मोठ्या संख्येने ट्वीट्स केले आहेत. हे वृत्त प्रकाशित करेपर्यंत या हॅशटॅगवर ५२ हजाराहून जास्त ट्वीट्स झालेले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आणि विशेषत: सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीट्सचा देखील समावेश आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला आवश्यकतेप्रमाणे लसींचा पुरवठा केला जात नसल्याचा आरोप केला होता. राज्यातील अनेक सत्ताधारी नेत्यांनी केंद्राकडे अतिरिक्त लसींचा पुरवठा करण्याची मागणी देखील केली. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी पत्रातून महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यावरून राज्यात पुन्हा राजकीय वाद पेटला असून गुरुवारी सकाळीच राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेतेमंडळींनी या राजकीय वादामध्ये आपापल्या भूमिका मांडल्या. ट्विटरवर देखील दिवसभर #MaharashtraNeedsVaccine या हॅशटॅगखाली प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला.

 

“हा (करोना) व्हायरल वेगाने राज्यामध्ये पसरत असून त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर आणि प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. व्यापक लसीकरण हा एकमेव मार्ग यात दिसतो आहे. लसींची कमतरता आमच्या प्रयत्नांना कमकुवत करत आहे”, असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

देशात सगळ्यांना करोना लस देणं शक्य आहे का? सीरमचे सीईओ अदर पूनावाला म्हणतात…!

 

“केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक का दिली जात आहे? आपण सारे आधी भारतीय आहोत”, असं ट्वीट धीरज देशमुख यांनी केलं आहे.

 

“महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी या गंभीर विषयावर शांतता धरून बसणं हे वेदनादायी, धक्कादायक आहे”, असं ट्वीट उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.

महाराष्ट्र पेटला म्हणून टाळ्या वाजवू नका… निवडणूक असलेल्या ५ राज्यातही करोना पेटणार आहे – डॉ. सुभाष साळुंखे

 

“ज्या प्रकारे चीनला वागणूक द्यायला हवी, तशी वागणूक केंद्र सरकार प्रत्येक बिगर भाजपा राज्याला देत आहे”, असं ट्वीट कुणाल कामरानं केलं आहे.

याव्यतिरिक्त अनेक नेटिझन्सनी आपली भूमिका ट्वीट्सच्या माध्यमातून मांडली आहे.

 

महाराष्ट्रावर अन्याय का? आकडेवारी देत राजेश टोपेंनी केला मोदी सरकारवर गंभीर आरोप!

 

 

 

 

“महाराष्ट्र सरकारमुळे आख्ख्या देशाच्या करोनाविरोधी लढ्याला फटका”, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा घणाघात!

दरम्यान, या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना सातारा, सांगली तसेच, पुणे आणि मुंबईच्या काही भागांमध्ये देखील लसीचे डोस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.