भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. अंत्ययात्रेला सुरूवात होण्याआधी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी दिल्ली भाजपाच्या मुख्यालयात ठेवण्यात आलं. सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जंतर मंतर येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि नेत्यांनी गर्दी केली. या गर्दीत केवळ राजकीय क्षेत्रातील लोकं नव्हते तर सामाजिक, व्यावसायिक, क्रीडासारख्या सर्वच क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

या गर्दीत सुषमांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाल फेटा घातलेला एक 96 वर्षांचा वृद्ध व्यक्ती देखील पोहोचला. सुषमांचं पार्थिव पाहताच त्यांचा भावनांचा बांध फुटला आणि त्यांना रडू कोसळलं. जोरजोरात रडणारी ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नव्हती तर ते होते एमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी. ढसाढसा रडणाऱ्या गुलाटींना अखेर उपस्थित इतरांनी शांत केलं आणि बाजूला नेलं.

अंत्ययात्रा निघण्याआधी सुषमा यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले. अंत्ययात्रा सुरु होण्याआधी स्वराज यांना सरकारी मानवंदना देण्यात आली. यावेळी सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल व मुलगी बांसुरी कौशल या बाप-लेकीच्या जोडीने सुषमा स्वराज यांना सलाम ठोकत मानवंदना दिली आणि साश्रू नयनांनी सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप दिला.