महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते मजेशीर व्हिडीओदेखील शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडीओंना फोटोंना मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सची पसंतीदेखील मिळते. सध्या ट्विटरवर त्यांचे ८० लाखांच्यावर फॉलोअर्स आहेत. यावेळी त्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीनं केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरला आहे.

एक व्यक्ती ट्रॅक्टरच्या सहाय्यानं गाईचं दूध काढत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ट्रॅक्टरमध्ये एका व्यक्तीनं एक पाईप लावला आहे आणि दुसरीकडे तो एका बंद डब्ब्याला जोडण्यात आला आहे. दुसरा पाईप व्हॅक्युमच्या मदतीनं दूध काढत आहे. हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रादेखील आश्चर्यचकीत झाले आणि त्यांना हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला.

“ग्रामीण भागांमध्ये आमच्या ट्रॅक्टरचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. त्याचे अनेक व्हिडीओ मला लोकं पाठवत असतात. परंतु हा व्हिडीओ माझ्यासाठी नवा आहे. या ठिकाणी काय केलं आहे हे कोणी इंजिनिअर नसलेली व्यक्ती सांगू शकते का?,” असंही महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ५ ऑगस्ट रोजी शेअर केला होता. त्यानंतर त्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.