मलेशियामध्ये एका गर्भवती मांजरीची निर्घृण हत्या करणाऱ्याला 34 महिने तुरूंगवास व 9700 डॉलर (जवळपास 7 लाख रूपये) डॉलर दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त चार महिने तुरूंगवासाची शिक्षा मिळेल असंही कोर्टाने स्पष्ट केलंय. मंगळवारी मलेशियाच्या सेलायंग सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

मलेशियाच्या सेलायंग सत्र न्यायालयाने गणेश नावाच्या व्यक्तीला प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत दोषी ठरवलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मांजरीची हत्या करण्यात आली होती. एका सीसीटीव्ही फुटेजद्वारे या मांजरीच्या हत्येचा खुलासा झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गणेश मांजरीला ड्रायरमध्ये टाकताना दिसत आहे. त्यावेळी गणेशसोबत अन्य एक व्यक्तीही होता अशीही माहिती आहे. क्वालालंपूर येथे एका सेल्फ सर्व्हिस लाँड्रीमध्ये असलेल्या ड्रायरमध्ये या मांजरीला टाकून तिची हत्या करण्यात आली. ड्रायर सुरू केल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला होता. पण थोड्यावेळाने तेथे आलेल्या एका महिलेने ड्रायरचा वापर केल्यानंतर तिला त्यात छिन्नविछिन्न अवस्थेत मांजरीचे शव सापडले. त्यानंतर त्याच महिलेने पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.

अजून वाचा – मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला ‘मयूरी मासा’, किंमत किती?

अजून वाचा – गंमतीत ५० अंडी खाण्याची पैज महागात, ४२ वं अंडं खाताच…

सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय गणेशने घेतला आहे. परिणामी, आरोपीची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. “ही शिक्षा इतरांसाठीही एक उदाहरण ठरेल आणि यामुळे प्राण्यांचा छळ करण्यास कोणी धजावणार नाही”, असं न्यायाधीश रासिहाह गजाली म्हणाले.