जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये मागील अनेक आठवड्यांपासून लॉकडाउनचा कालावधी सुरु आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासून हॉटेल्स, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणी होणारे कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली आहे. याचा सर्वात मोठा फटका पर्यटन, हवाई वाहतूक, मनोरंजन क्षेत्रांबरोबर मॉल्सलाही बसला आहे. अनेक देशामध्ये मागील दोन महिन्यांपासून मॉल्स बंद आहेत. मात्र मलेशियामध्येही असाच एक ५० दिवसांपासून बंद असणारा मॉल पुन्हा सुरु झाल्यानंतर आतमधील परिस्थिती बघून तेथील दुकानदारांना धक्काच बसला आहे.

५० दिवस सर्व प्रकारचे उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद ठेवल्यानंतर मेलशियाने काही दिवसांपूर्वीच टप्प्या टप्प्याने देशातील सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच मॉल्सही पुन्हा सुरु करण्यात आले. मात्र मॉल उघडल्यानंतर या मॉलमध्ये दुकाने असणाऱ्या व्यापारांना ५० दिवसात दुकानांची झालेली स्थिती पाहून धक्का बसला आहे. येथील पेनांग पुलाऊ टिकूसमधील मॉल ५० दिवसांनंतर सुरु करण्यात आला. पुन्हा सारं काही नव्याने सुरु होणार या उत्साहाने व्यापाऱ्यांनी मॉलमधील आपली दुकाने उघडली आणि त्यांना आतील परिस्थिती पाहून धक्काच बसला. मॉलमधील अनेक दुकांनामधील कपड्यांना तसेच चामड्याच्या वस्तुंना बुरशी लागल्याचे दिसून आले.

मॉलमध्ये चामड्याच्या वस्तू विकणाऱ्या दुकानांमधील अनेक गोष्टींना बुरशी लागल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक दिवसांपासून मॉल बंद असल्याने दमट हवामानामुळे मॉलमधील चामड्याच्या वस्तुंवर बुरशी लागल्याने लाखो रुपयांच्या वस्तू खराब झाल्या आहेत. अनेक वस्तू तर आहे त्या स्थितीमध्येच बुरशी लागल्याने खराब झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या खराब झालेल्या वस्तुंचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी हे फोटो भारतातील मॉलमध्ये असल्याचे सांगत सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केले आहेत. मात्र ‘अल्ट न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार हा सर्व प्रकार मलेशियामध्ये घडलेला आहे.

सामान्यपणे मॉलमधील एसी सुरु असल्याने आणि हवा खेळती असल्याने तसेच दररोज साफसफाइ होत असल्याने चामड्यांच्या वस्तुंना बुरशी लागत नाही. मात्र जवळजवळ दोन महिने मॉल बंद असल्याने आणि देखभाल करणारं कोणीच नसल्याने मोठ्याप्रमाणात वस्तू खराब झाल्याचे पहायला मिळालं आहे. अर्थात या वस्तू उच्च प्रतिच्या चामड्याच्या असल्याने तेल आणि विशेष प्रकारच्या क्लिनिंगनंतर त्या पुन्हा पुर्वीसारख्या होतील. मात्र यासाठी आता व्यावसायिकांना कष्ट घ्यावे लागणार आहे.

चामड्याच्या वस्तुंबरोबरच कापड्यांनाही मोठ्याप्रमाणात बुरशी लागल्याचे दिसून आलं आहे.

इंडोनेशियामधील सरकारने अनेक अटी आणि निर्बंधांचे पालन करण्याचे आदेश मॉल्स आणि दुकानदारांना दिले आहेत. यामध्ये मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरिराचे तापमान तपासून पाहणे, सॅनिटायझर ठेवणे, स्वच्छता राखणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.