मलेशियाचे माजी राजे सुलतान मोहम्मद यांनी रशियन सुंदरीला घटस्फोट दिला आहे. ट्रिपल तलाक देऊन त्यांनी वैवाहिक नाते संपुष्टात आणले. लग्नाची बातमी समोर आल्यानंतर काही महिन्यांच्या आत हा घटस्फोट झाला. माजी मिस मॉस्को असलेल्या रिहाना ऑक्झाना गॉर्बाटेंकोने मात्र घटस्फोटाचे वृत्त फेटाळून लावले आहे. अजूनही आपण सुलतान मोहम्मद पाचवे यांची पत्नी आहोत.

रिहानाने राजांसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दोन वर्ष राजेपद भूषवल्यानंतर यावर्षी जानेवारी महिन्यात सुलतान मोहम्मद पाचवे यांनी आपले सिंहासन सोडले. मागच्यावर्षी त्यांनी माजी मिस मॉस्कोसोबत विवाह केल्याच्या बातम्या समोर आल्या. शरीया कायद्यानुसार २२ जून २०१९ रोजी सुलतान मोहम्मद यांनी रिहानाला ट्रिपल तलाक दिला.

सिंगापूर स्थित सुलतानच्या वकिलाने ही माहिती दिली. मलेशियाच्या किलानतान प्रांतातील इस्लामिक कोर्टाने घटस्फोटाला मान्यता दिली. माजी मिस मॉस्को राहिलेल्या रिहानाने घटस्फोटाचे वृत्त फेटाळले आहे. मला थेट घटस्फोट दिल्याचे अजूनतरी मी ऐकलेले नाही असे तिने सांगितले. अजूनही ती सुलतान आणि त्यांच्या मुलासोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आहे. यावर्षी मे महिन्यात तिने मुलाला जन्म दिला.

सुलतान मोहम्मद यांनी पदत्याग केल्यानंतर सुलतान अब्दुल्लाह सुलतान अहमद शाह यांची मलेशियाच्या राजेपदी निवड झाली. मलेशियात राजेपदासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. नऊ राज्यातील राजघराण्यांमधून दर पाचवर्षांनी नव्या राजाची निवड केली जाते.