काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खारगे यांच्याबाबतीत जे घडलेच नाही, त्याचे धादांत खोटे वर्णन सध्या ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरून प्रसारित केले जात आहे.

लोकसभेत खारगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाटय़च घडले. खारगे मोदी यांच्यासमोर रडले. त्यांनी दलितांना चरितार्थ चालविण्यासाठी छोटासा का होईना जमिनीचा तुकडा दिल्यास ते सन्मानाने जीवन जगतील, असे उद्गार खारगे यांच्या तोंडी टाकून मोदी यांनी त्यावर या काँग्रेस नेत्याच्या मालमत्तेची यादीच सभागृहात वाचून दाखवल्याचे वर्णन सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे, परंतु लोकसभेत तसे काही घडलेले नव्हते. मोदी आणि खारगे यांच्यातील कथन केलेले वाक् युद्ध बनावट असल्याचे स्पष्ट झाले.