चीनमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे येथील एक तरुण आपल्या प्रेयसीबरोबर डेटवर गेला होता. मात्र डेटनंतर हॉटेलचे बिल भरण्याऐवजी या तरुणाने पळ काढला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याने असं का केलं. तर या मुलाची प्रेयसी डेटवर येताना आपल्या २३ मित्रमैत्रिणींना घेऊन आली होती. या सर्वांच्या खाण्याचं एकूण बील हे दोन लाखांहून अधिक झाल्याने बिल आल्यावर प्रियकराने पळ काढला. विशेष म्हणजे हे दोघे एकमेकांना केवळ फोन कॉल आणि सोशल नेटवर्किंगवरुन ओळखत होते आणि पहिल्यांदाच ते ब्लाइंड डेटसाठी प्रत्यक्षात भेटलेले.

ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मुलीने हा तरुण किती उदार आहे हे जाणून घेण्यासाठी ब्लाइंड डेटला आपल्या २३ मित्रांना बोलवल्याचे समजते. या सर्वांना पाहून त्या तरुणाला थोडा धक्का बसला मात्र नंतर हॉटेलचे बिल पाहून तो घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला. डिनर डेटनंतर सर्वांचे जेवण झाल्यावर बिल देण्याची वेळ आली तेव्हा माझ्या प्रियकराने तिथून पळ काढला होता. त्यानंतर या मुलीनेच आपल्या मित्रांचे १९,८०० युआन म्हणजेच अंदाजे दोन लाख १७ हजार ८०० रुपयांचे बिल भरलं.

समोर आलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार चीनच्या पूर्वेला असणाऱ्या झेजियांग प्रांतात घडला. येथे राहणाऱ्या लियू नावाचा २९ वर्षीय तरुण आपल्या आईच्या सांगण्यानुसार सोशल मीडियावरुन तरुणीची ओळख वाढवून या ब्लाइंड डेटला गेला होता. या दोघांचाही यापूर्वी कधीच भेट झाली नव्हती. मात्र हॉटेलचे बिल पाहून लियूने पळ काढला. डिनरनंतर मुलीने लियूला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो आऊट ऑफ रिच होता. अखेर या मुलीलाच बिल भरुन हॉटेलबाहेर पडावे लागले.

बिल भरल्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली आणि मग लियूचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर लियूने दोन टेबलचे बिल भरण्याची त५यारी दर्शवली. त्यानंतरही या मुलीला १५ हजार ४०२ युआन म्हणजेच एक लाख ६९ हजारांहून अधिक बिल भरावे लागले. चीनमधील सोशल मीडियावर या घटनेची सध्या जोरदार चर्चा आहे. अनेकांनी या मुलाची बाजू घेतली असून मुलीने केलेला प्रकार हा निंदनीय असल्याचे म्हटले आहे.