ओला आणि उबेरचा सध्या भारतभर संप असल्याने प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र आहे. खासगी वाहतूक क्षेत्रात कमी कालावधीत आपले स्थान निर्माण केलेल्या या कंपन्यांना ग्राहकांनीही अतिषय चांगला प्रतिसाद दिला होता. पण आता ओला कंपनी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ती म्हणजे बंगळुरुमधील एका तरुणाने नेहमीप्रमाणे ओला कॅब बुक केली. यामध्ये त्याने लोकेशन देताना बंगळुरु ते उत्तर कोरिया असे लिहीले. आता हे लोकेशन कसे मान्य होईल? पण ते झाले.

विशेष म्हणजे या मार्गावरील कॅबचालकाला ही सगळी माहिती मिळाली आणि तो संबंधित तरुण असलेल्या ठिकाणी पोहोचलाही. रोहीत मेंडा हा तरुण वेब आणि मोबाईल डेव्हलपर असून त्याच्या बाबतीत ही घटना घडल्याने तोही काहीसा गोंधळून गेला. याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे या प्रवाशाला त्याने टाकलेल्या प्रवासाचे तपशीलही आले. त्यानुसार त्याला बंगळुरु ते उत्तर कोरियाच्या प्रवासासाठी ६ दिवस लागणार असल्याचे दिसत होते. याहूनही गमतीची गोष्ट म्हणजे या प्रवासासाठीचा खर्चही यामध्ये देण्यात आला. ही रक्कम आहे १,४९,०८८ रुपये.

रोहीतने आपल्याला आलेल्या या सगळ्या माहितीचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. त्याने ओलाच्या ट्विटर हँडलला यामध्ये टॅगही केले आहे. या ट्विटवर ओलाकडून उत्तरही आले असून काही तांत्रिक कारणांमुळे हे झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपला फोन रिस्टार्ट करुन पुन्हा प्रयत्न करावा अशी विनंतीही ओलाकडून रोहीत या प्रवाशाला करण्यात आली आहे. ही तक्रार आम्ही नोंदवून घेतली असून त्याविषयी योग्य ती कार्यवाही होईल असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. रोहीतच्या या ट्विटनंतर अनेक प्रवाशांनी आपल्याला ओलाकडून अशापद्धतीने आलेल्या चुकीच्या गोष्टींचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.