खोट्या नोटा आणि चेक छापून चोऱ्या केवळ चित्रपटांमध्ये केल्या जातात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूकीचा विचार करत आहात. कारण अशा गोष्टी रिल लाइफबरोबरच रियल लाइफमध्येही घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. असेच एक उदाहरण अमेरिकेतील फ्लोरेडामध्ये समोर आलं असून येथील एका व्यक्तीने घरातील कंप्युटरवर प्रिंट केलेल्या खोट्या चेकच्या मदतीने चक्क एक कोटींची पोर्शे ही अलिशान सुपरकार विकत घेतली. मात्र महागडी घड्याळ घेण्याच्या तयारीत असतानाच या व्यक्तीचा खोटारडेपणा उघड झाला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

वॉल्टन काउंटी शेरिफच्या कार्यालयामधून देण्यात आलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कॅसी विल्यम केली असं असून तो ४२ वर्षांचा आहे. फसवणूक केल्याच्या गुन्ह्याखाली त्याला पोलिसांनी अटक केली आहे. फ्लोरिडा येथील डेस्टीनमध्ये असणाऱ्या पोर्शेच्या अलिशान शो रुममधून कॅसीने गाडी विकत घेतली. यावेळी त्याने घरच्या कंप्युटरवर प्रिंट केलेला चेक कॅशियरला दिला. याच खोट्या चेकच्या मदतीने तो पॉर्शे ९११ गाडी घेऊन निघून गेला. आपल्याला खोटा चेक दिला आहे हे शो रुममधील व्यक्तींना कळालंही नाही.

नक्की वाचा >> आठ वर्षांपूर्वी सिगारेट सोडली; वाचवलेल्या पैशांमधून साकार केलं मोठ्या घराचं स्वप्न

फसवणूक लक्षात आल्यानंतर पोर्शे शोरुमच्या अधिकाऱ्यांनी ओकालोसा कंट्री शेरिफच्या कार्यालयामध्ये गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. शोरुममध्ये देण्यात आलेला १ लाख ३९ हजार २०३ डॉलर्सचा चेक बनावट असल्याचे या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. गाडीच्या शोरुममध्ये केलेली फसवणूक पुन्हा करण्याचा प्रयत्नात कॅसी पोलिसांच्या हाती लागला.

एकीकडे हा गोंधळ सुरु असतानाच दुसरीकडे कॅसीने गाडी विकत घेतल्यानंतर आणखीन एक खोटा चेक देऊन रोलेक्स या कंपनीची तीन महागडी घड्याळं विकत घेतली. त्याने मिरामार बीच येथील एक ज्वेलर्सच्या दुकानामध्ये ६१ हजार ५२१ डॉलरचा खोटा चेक दिला. मात्र पोर्शेच्या अधिकाऱ्यांनी केलेली चूक ज्वेलर्सने टाळली आणि चेक क्लियर होईपर्यंत घड्याळं कॅसीच्या ताब्यात दिली नाही. मात्र देण्यात आलेला चेक खोटा असल्याचे लक्षात आल्यानंतर ज्वेलर्सने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांसाठी कॅसीला अटक केली.

नक्की वाचा >> OLX वर विकायला काढलं Mig-23 फायटर जेट किंमत ९ कोटी ९९ लाख

Photo : Walton County Sheriff’s Office

कॅसीला कोर्टासमोर हजर केले कोर्टाने पुढील सुनावणीसाठी २२ सप्टेंबरची तारीख दिली आहे.