एखाद्या देशातील स्थानिक भाषा येत नसताना अशा देशात भटकंतीसाठी जाणे अनेकदा अडचणीचे ठरते. भटकंती करताना अनेक गोष्टी स्थानिकांना समजावून सांगणे जमत नाही. अशावेळेस हातवारे करुन किंवा सांकेतिक भाषेत आपले म्हणणे सांगावे लागते. असंच काहीसं झालं युकेमध्ये फिरायला गेलेल्या एका अरेबिक व्यक्तीबरोबर.

झालं असं की या व्यक्तीने घेतलेल्या हॉटेल रुममध्ये उंदीर शिरला. मात्र उंदराला नक्की काय म्हणतात हे ठाऊक नसल्याने त्याने रिसेप्शनला फोन करुन अगदी मजेशीर पद्धतीने तक्रार नोंदवली. “या अरब व्यक्तीने हॉटेलच्या रिसेप्शनला फोन करुन खोलीमध्ये उंदीर असल्याची तक्रार केली. पाहा त्याने कशापद्धतीने केली तक्रार,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडिओ ट्विटवर अपलोड करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हिडिओमध्ये एक फोन दिसत असून त्यामधील रेकॉर्डवर या अरब व्यक्तीने केलेली तक्रार ऐकू येत आहे. ही व्यक्ती रिसेप्शनवर असणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्याला “माझं इंग्रजी चांगलं नाहीय,” असं सांगते. त्यानंतर ही व्यक्ती रिसेप्शनवरच्या व्यक्तीला तुम्हाला टॉम अॅण्ड जेरी ठाऊक आहे का असं विचारते. यावर होकारार्थी उत्तर आल्यानंतर ही व्यक्ती, “माझ्या खोलीमध्ये जेरी आहे. तुम्ही लवकर टॉमला घेऊन या,” असं सांगते.

ही तक्रार ऐकून हॉटेल कर्मचाऱ्याने, “तुमच्या खोलीत उंदीर आला आहे,” असं विचारत माहिती घेतली. “तुम्ही येताना तुमच्याबरोबर टॉमला घेऊन या,” असंही ही व्यक्ती सांगते. त्यावर हॉटेलमधील कर्मचारी, “आमच्या हॉटेलमध्ये टॉम नाही,” असं सांगत फोन ठेवतो. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ…

हा व्हिडिओ ट्विटवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. २ लाख ८१ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे.

जेरीची प्रतिक्रिया

टॉमला हॉटेलमधून कॉल आला

टॉमने कधी जेरीला पकडलेच नव्हते

टॉम तयारीत बसलेला असताना

समोरच्या व्यक्तीचं उत्तरही मजेशीर होतं…

एक कोटी १५ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून तो व्हायरल झाला आहे. अनेकांनी या अरब व्यक्तीच्या भोळेपणाचे कौतुक केलं आहे.