आसाममध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. हत्तीने चिरडल्यामुळे इथे पास्कल मुंडा नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २५ जुलै रोजी अप्पर आसामच्या नुमालीगडमधील मोरोंगी टी इस्टेटजवळ एनएच ३९ वर ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, हत्तींचा एक कळप राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना तिथे जवळच काही मजूर आणि स्थानिक लोक गर्दी करून उभे होते. त्यातही स्वस्थ उभं न राहता त्यापैकी अनेक जण हत्तींचा हा कळप शांतपणे आपल्या मार्गाने रस्ता ओलांडत असताना विनाकारण त्यांना छेडतही होते. परिणामी, त्यांपैकी एका चिडलेल्या हत्तीने तेथील लोकांच्या गर्दीतील एका व्यक्तीचा पाठलाग करून त्याला चिरडलं.

आयएफएस अधिकारी परवीन कसवान यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे कि, येथील कामगारांनी शांतपणे रस्ता ओलांडणाऱ्या हत्तींना विनाकारण छेडलं. जांभळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक माणूस आपल्या हातात एक पिवळ्या रंगांची वस्तू घेऊन ती दाखवून या हत्तींना भडकावण्याचं काम करताना दिसत आहे. सोबतच ह्या व्हिडिओमध्ये मागून अनेक दुचाकींच्या हॉर्नचा आवाज देखील स्पष्ट ऐकू येत आहेत. अशाप्रकारे, या व्हिडिओमध्ये अनेक जण गर्दी करून इथे हत्तींच्या या कळपाला चिडवत होते. परंतु, त्यानंतर हत्ती पुढे आल्यावर ते घाबरून मागे सरकले. मात्र, नको ते घडलंच.

“एका माणसाने आपला जीव गमावला. दोष नक्की कोणाला द्यावा?”

लोकांच्या चिडवण्यामुळे संतापून पुढे या कळपातील हत्तींपैकी एकाने लोकांच्या या गर्दीचा पाठलाग केला. यावेळी आपला बचाव करण्यासाठी हत्तीपासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पास्कल मुंडा हा व्यक्ती खाली पडला आणि हत्तीने त्याला चिरडलं. त्यानंतर तातडीने पास्कलला गोलाघाट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, परवीन कसवान यांनी हा व्हिडीओ शेअर करताना एक अत्यंत सूचक कॅप्शन दिलं आहे. परवीन म्हणाले “एका माणसाने आपला जीव गमावला. मात्र, दोष नक्की कोणाला द्यावा? हे कळत नाही.” खरंच हे विचार करायला लावणारं आहे.