मोहनन भीक मागून आपलं पोटं भरतात. डोक्यावर छप्पर नाही, दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत आहे. भीक मागून जे पैसे मिळतात त्यात आलेला दिवस ते ढकलतात. मात्र जेव्हा केरळवर आपत्ती कोसळल्याचं त्यांना कळलं तेव्हा भीक मागून जमवलेले सारे पैसे त्यांनी केरळवासीयांना मदत म्हणून दान केले.

केरळवासीयांच्या मदतीसाठी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस स्वत:जवळचे काही रुपये दिले आहेत. कित्येक किलोमीटरचं अंतर पार करून मोहनन एका स्थानिक नगरसेवकाकडे पोहोचले. कदाचित मोहनन भीक मागत असल्याचं वाटून नगरसेवकानं त्याला मदतही केली. मात्र मोहननं ही मदत नाकारली. पण, इतके दिवस भीक मागून त्यांनी जे पैसे जमवले होते ते त्यांनी पुढे करत ही मदत पुरग्रस्तांना देण्याची विनंती केली.

स्वत:जवळ पैसे नसतानाही भीक मागून जमवलेली पुंजी मनाचा उदारपणा दाखवत मोहनन यांनी दान केली. त्यांचा तो दानशूरपणा पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आलं. केरळच्या पुरग्रस्तांसाठी जगभरातून मदत आली. त्यात सामान्यही अधिक होते. काहींनी तर स्वत:जवळ फार पैसे नसतानाही पुरग्रस्तांना मदत केली. केरळवासीयांसाठी सर्वसामान्यांनी केलेल्या मदतीचा आकडा हा जवळपास १०२७ कोटींवर पोहोचला आहे.