आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन…ही म्हण तुम्ही आतापर्यंत ऐकली असेलच… अमेरिकेतील Newberg- Oregon शहरातील पोलिसांनी या म्हणीचा अनुभव घेतला आहे. पोलिसांना चकवून पळणारा एक कारचोर अपघाताने एका महिलेच्या गाडीला जाऊन धडकला. यानंतर पोलीस तपासात कारचोराने धडक दिलेली महिलाही चोरीची गाडी चालवत असल्याचं समोर आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रँडी ली कूपर हा २७ वर्षीय तरुण चोरीची लँड क्रूझर गाडी चालवत होता. शहरातील एका व्यक्तीने आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केल्यानंतर, तपासादरम्यान त्यांना रँडी गाडी चालवत असल्याचं समजलं. पोलीस आपल्या पाठीमागे लागल्याचं समजताच रँडीने गाडीचा वेग वाढवत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात रँडी समोरुन येत असलेल्या एका महिलेच्या गाडीला जाऊन धडकला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत रँडीला ताब्यात घेतलं. यानंतर तपासादरम्यान, रँडीने धडक दिलेली महिलाही चोरीची गाडी चालवत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी आपल्या फेसबूक पेजवर याबद्दल माहिती दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी रँडीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. रँडीने ज्या गाडीला धडक दिली, ती गाडी २५ वर्षीय क्रिस्टन निकोल बेग ही तरुण चालवत होती. तपासादरम्यान क्रिस्टनने अमली पदार्थांचं सेवन केल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे पोलिसांनी अमली पदार्थांच्या नशेत गाडी चालवणे आणि चोरीचा गुन्हा दाखल करत क्रिस्टनलाही अटक केली आहे.