एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचे अंत्यविधी करण्याची पद्धत अनेक समाजात आहे. धार्मिक परंपरेनुसार या प्रथा पाळल्याही जातात. मात्र एखाद्या पक्ष्याचे किंवा प्राण्याचे अंत्यविधी केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे? पण हे खरे आहे, उत्तर प्रदेशमध्ये अशी घटना घडली आहे. आपल्या अतिशय आवडत्या अशा पाळीव पोपटाचा अंत्यविधी करण्यात आला आहे. पंकज कुमार मित्तल या व्यक्तीचा हा पोपट असून त्याचा मृत्यू झाल्यावर हिंदू रिवाजानुसार, या पोपटाचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पेशाने शिक्षक असलेले मित्तल हसनपूर याठिकाणी राहतात.

या पोपटाचा अंत्यविधी झाल्यानंतर मित्तल यांनी हवन आणि गोडाचे जेवणही आयोजित केले होते. मित्तल म्हणाले, या पोपटाला मी ५ वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते. तेव्हा त्याला पायाला काही जखम झाल्याने उडता येत नव्हते. तेव्हापासून मी त्याची माझ्या मुलाची घेईन त्यापेक्षाही चांगली काळजी घेतली होती. मित्तल कुटुंबाने या पोपटाच्या मृत्यूनंतर त्याचा व्यक्तीचा करतो त्याप्रमाणे गंगाघाट येथे रितीरिवाजाप्रमाणे अंत्यविधी केला. इतकेच नाही तर एएनआयने दिलेल्या माहितीनुसार मित्तल कुटुंबियांनी या पोपटावर केवळ अंत्यसंस्कारच केले नाहीत तर त्याची शोकसभाही आयोजित केली.