आपण कधी खरेदीला गेलो किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेलो आणि डोक्यात विचार असतील तर आपण गाडी कुठे पार्क केली हे विसरतो. पण जर्मनी मधली एक घटना ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जर्मनीतील एक गृहस्थ काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी येताना आपण कार आणली होती हे ते पूर्णपणे विसरले. विशेष म्हणजे आपली कार हरवली असल्याची त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवली. आता ही हरवलेली कार तक्रार केल्यानंतर तरी मिळावी ना. त्यातही परदेशात अशाप्रकारे तक्रार नोंदविल्यावर त्यावर लगेच कारवाई होते असेही म्हटले जाते. पण या व्यक्तीला आपली कार एक दोन नाही तर तब्बल २० वर्षांनी सापडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर्मनीतल्या फ्रँकफर्ट येथे १९९७ मध्ये ही कार हरवली होती. हरवली म्हणजे ही व्यक्तीच ती कार विसरला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना आपली २० वर्षांपूर्वी हरवलेली कार अचानक सापडली. आता २० वर्षांनी कार सापडली म्हणजे तीची काय अवस्था झाली असेल वेगळं सांगायला नको. त्याचा रंग उडाला होता, तिच्यावर गंजही चढला आहे. वापरात नसल्याने या कारचे इंजिनही खराब झाले आहे. यामध्ये आणखी एक गंमत आहे ती म्हणजे ही कार सापडल्यानंतर या महाशयांना आठवलं की आपली कार चोरीला गेली नव्हती तर ती एका पार्किंगमध्ये आपल्याकडूनच विसरली होती.

आता इतकी जुनी कार सापडल्यावर त्याचं काय करणार हा प्रश्न होताच कारण गाडीचं मॉडेल जुनं झालं होतं. आणि अवस्थाही बेकार झाली होती. त्यामुळे ही गाडी आता भंगारात जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे २० वर्षांपूर्वी कार हरवलेल्या या कारचा मालक आता ७६ वर्षांचा झाला आहे. आता काय म्हणावे या विसरभोळेपणाला…

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man in germany forgot his car which was parked before 20 years finally found it
First published on: 20-11-2017 at 13:28 IST