जेव्हा अप्रेजलची वेळ असते तेव्हा आपल्या अपेक्षा वाढलेल्या असतात. परंतु अप्रेजल लेटर हातात पडलं की आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागते. चांगली काम आणि चांगलं वेतन अशी सर्वांचीच अपेक्षा असते. अमेरिकेतील एका कंपनीने नुकतीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात केलेली वाढ पाहून आपले डोळे पांढरे होतील. अमेरिकेतील डॅन प्राईस यांनी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल ७ लाख रूपयांची वाढ केली आहे. सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ‘जगातील बेस्ट बॉस’ अशी उपाधीच देऊन टाकलीये.

अमेरिकेतील ग्रॅव्हिटी पेमेंट्स या कंपनीत डॅन हा सीईओ पदी कार्यरत आहे. त्यानं आपल्या कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याचं वेतन ७ लाख १० रूपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कंपनीत सर्वात कमी वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं वेतनही वार्षिक २८ लाख ४२ हजारांच्या जवळपास आहे.

इतकंच काय तर त्याने पुढील पाच वर्षांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४९ लाख ७४ हजारांची वाढ करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. डॅनची  कंपनी क्रेडिट कार्ड प्रोसेसिंगच्या व्यवसायात कार्यरत आहे. सध्या त्याच्या कंपनीने ‘चार्ज इट प्रो’ कंपनीचेदेखील अधिग्रहण केलं आहे. यापूर्वी डॅनने २०१५ मध्ये स्वत:च्या वेतनात ८० ते ९० टक्क्यांची कपात केली होती. दरम्यान, आपल्या निर्णयामुळे आपल्या कर्मचाऱ्यांचा जीवनस्तर उंचावत असल्याचं पाहून आनंद होत असल्याचं डॅन म्हणतो.